नागपूर - गेल्या पंधरा दिवसांपासून उपराजधानी नागपुरात कोरोनारुग्णांच्या संख्येत मोठी वाढ नोंदविण्यात आली आहे. त्यामुळे समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाची साखळी तोडण्याच्या उद्देशाने शहरात आठ दिवसांची संचारबंदीदेखील सुरू करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणाऱ्या दुकानांसाठी नवी नियमावलीही जाहीर केली आहे. कोरोनाचे रुग्ण वाढल्याने संचारबंदी लावण्यात आली असली तरी नागरिकांनी घाबरण्याचे कारण नसल्याचे मनपा आयुक्तांनी म्हटले आहे. शहरात कोरोना टेस्टिंगची संख्या मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आल्याने पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढल्याचे त्यांनी सांगितले आहे.
विकेंड कर्फ्यूला प्रतिसाद नाही
गेल्या महिन्यात शहरात झालेल्या लग्न समारंभासह अनेक सामाजिक कार्यक्रमांमध्ये मोठ्या संख्येत लोकांची गर्दी जमा झाल्याचे पाहायला मिळाले, ज्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने झाला आहे. पुढे हा धोका टाळण्यासाठीच शहरात सुरुवातीला विकेंड कर्फ्यू लावण्यात आला होता, मात्र त्याला फारसा प्रतिसाद शहरवासीयांनी दिला नसल्यानेच संचारबंदीचा निर्णय घ्यावा लागल्याचे ते म्हणाले.