नागपूर - १६ जानेवारीपासून संपूर्ण राज्यात कोरोनाला प्रतिबंध घालण्याच्या उद्देशाने लसीकरणाची मोहीम राबवली जात आहे. मात्र या तीन दिवसांमध्ये केवळ निर्धारित संख्येच्या ५२ टक्केच लोकांचे लसीकरण होऊ शकल्याची माहिती जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिली आहे. यातही ग्रामीण भागात निर्धारित संख्येच्या ७५ टक्के लसीकरण झाले आहे तर शहरी भागात हे प्रमाण फारच कमी असल्याचे पुढे आले आहे. सुरुवातीला तंत्रिक अडचणी असल्याने ही संख्या कमी झाली असली तरी येत्या दिवसांमध्ये हा आकडा वाढणार असल्याचे ते म्हणाले आहेत.
एकूण बारा केंद्र कार्यान्वित
सलग एक वर्ष कोरोनाविषाणूंनी अक्षरशः धुमाकूळ घातल्यानंतर आता कुठे कोणाला प्रतिबंध घालणारी लस उपलब्ध झाली आहे. या माध्यमातून शरीरात रोगप्रतिकारक शक्ती म्हणजेच अँटीबॉडीज तयार होणार आहेत. पहिल्या टप्प्यात आरोग्य सेवकांना लसीचा डोस दिला जात आहे. त्याकरिता नागपूर शहरात पाच आणि जिल्ह्यात सात असे एकूण बारा केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहेत. प्रत्येक केंद्रावर दर दिवसाला 100 आरोग्य सेवकांना लस देण्याचे लक्ष देण्यात आले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील ३६०० आरोग्य कर्मचार्यांना लस दिली जायला हवी होती. मात्र प्रत्यक्षात केवळ २३५६ लोकांनाच लसीचा डोस देण्यात आला आहे. यामध्ये नागपूरच्या ग्रामीण भागातील सात केंद्रांवर तीन दिवसात १५७७ आरोग्य सेवकांनी लस टोचून घेतली आहे. तर शहरातील पाच केंद्रांवर केवळ १५०० सेवकांनी पुढाकार घेतल्याचे आकडे समोर आले आहेत.