नागपूर - सध्या राज्यात म्युकरमायकोसिस या आजाराचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. मात्र, म्युकरमायकोसिस आजारावर उपचारासाठी लागणारे महत्वाचे औषध 'एम्फोटेरेसीन- बी' हे इंजेक्शन महाराष्ट्रात अंबरनाथ येथील एकच कंपनी बनवत आहे. त्यामुळे राज्यात या इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. आजाराचा वाढता प्रादुर्भाव पाहता वर्ध्यातील एका कंपनीला हे इंजेक्शन निर्मिती करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यानंतर आता नागपूरच्या हिंगणा एमआयडीसीतील युनिज्युल्स लाईफ सायन्सेस या कंपनीलाही अन्न आणि औषध प्रशासनाकडून इंजेक्शन निर्मितीस मान्यता मिळाली आहे. लवकरच या कंपनीकडून औषध निर्मितीला सुरुवात करण्यात येईल त्यामुळे येत्या काही दिवसातच 'एम्फोटेरेसीन- बी' तुटवडा भरून निघणार आहे.
नागपुरात 'एम्फोटेरेसीन- बी'चा तुटवडा कायम-
राज्यात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावानंतर ब्लॉक फंगसचा प्रसार वेगाना होताना दिसून येत आहे. यावर उपचार करण्यासाठी 'एम्फोटेरेसीन- बी' या इंजेक्शनचा वापर करण्यात येतो. मात्र, सध्या वाढत्या मागणीमुळे या इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर वर्ध्याच्या एमआयडीसीमधील जेनेटिक लाईफ सायन्सेस या कंपनीला रेमडेसिवीर आणि आता एम्फोटेरेसीन बी इंजेक्शन बनवण्याची परवानगी मिळाली आहे. मात्र, त्याचे अद्याप उत्पादन सुरू झालेले नाही. यामुळे औषधांचा तुटवडा अद्यापही कायम आहे. जिल्ह्यासाठी मागील आठवड्यात केवळ 300 इंजेक्शनचा साठा उपलब्ध झाला होता. मात्र, वाढत्या रुग्ण संख्येच्या तुलनेत हा पुरवठा अत्यल्प आहे. त्यामुळे म्युकरमायोसिस बाधित रुग्णांची आणि त्यांच्या नातेवाईंकाची मोठी तारांबळ निर्माण होत आहे.