नागपूर -कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे महापालिकेकडून उपाय योजना राबवण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाने शहरातील २० मंगल कार्यालयावर कारवाई केली आहे. प्रशासनाने लग्न समारंभासाठी जारी केलेल्या नियमावलीचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आल्याने मनपाद्वारे ही कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये लाखोंचा दंड वसूल करण्यात आला आहे. सोबतच दहाही झोनमधील ८८ सभागृहांची तपासणी करण्यात आली.
मनपा आयुक्तांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन शोध पथकांद्वारे ही कारवाई केली जात आहे निर्धारित क्षमतेपेक्षा जास्त लोक आढळून आलेल्या मंगल कार्यालयाकडून दंड वसूल करण्यात आला आहे. यापैकी एम्पोरियम हॉल व जगत सेलिब्रेशन लॉनकडून प्रत्येकी १५ हजार रुपये दंड तात्काळ वसूल करण्यात आला आहे, तर वर्धमाननगर येथील सात वचन लॉन कार्यालय बंद असल्याने त्यांना १५ हजार रुपयांची नोटीस बजावण्यात आली आहे. तर गोधनी मार्गावरील गोविंद लॉनकडून ५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.