नागपूर -नागपुरच्या कार्तिक जयस्वाल या 21 वर्षीय तरुणाने एका तासात सर्वाधिक पुशअप मारण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मोडलेला आहे. कार्तिकने एका तासात 3331 पुशअप मारून नवा जागतिक किर्तीमान प्रस्थापित केला आहे. या आधी हा विश्वविक्रम ऑस्ट्रेलियन खेळाडू डॅनियल स्कालीच्या नावावर आहे. त्याने याच वर्षी या रेकॉडला गवसणी घातली होती. मात्र, अवघ्या काही महिन्यांतचं कार्तिकने हा रेकॉर्ड मोडीत काढून विश्वविक्रमाची नोंद केली आहे. याआधी सुद्धा कार्तिकने एका मिनिटात सर्वाधिक टाईल्स फोडण्याचा रेकॉर्ड केला ( Guinness World Record By Pushup In Nagpur ) होता.
कार्तिक जयस्वाल एमएमए फायटर भारत आणि आशिया बुक ऑफ रेकॉर्ड होल्डर फिटनेस प्लेयर आहे. एका तासात सर्वात जास्त पुशअप मारण्याचा रेकॉर्ड मोडीत काढण्यासाठी कार्तिक गेल्या पाच वर्षांपासून दर दिवशी सहा तासांपेक्षा आधिक वेळ सातत्याने सराव करतो आहे. कार्तिकने ऑस्ट्रेलियन खेळाडू डॅनियल स्कालीचा रेकॉर्ड मोडण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची घोषणा केली. तेव्हा डॅनियल स्काली हा रेकॉर्ड कुणीही मोडू शकणार नाही, असे आवाहन दिले होते. त्यानंतर कार्तिकने जिद्द आणि पराक्रमाच्या जोरावर एका तासात 3331 पुशअप मारून नवा जागतिक किर्तीमान प्रस्थापित केलेला आहे.