नागपूर - शहरातील कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवाजी नगर परिसरात एका तरुणाची दोन ते तीन आरोपींनी मिळून हत्या केल्याची घटना घडली आहे. योगेश धोंगडे (३०) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. अनैतिक संबधातून योगेशची हत्या झाल्याची प्राथमिक माहिती पोलीस उपायुक्त लोहित मातानी यांनी दिली आहे. घटनेतील आरोपी गोलू धोटे हा त्याच्या सहकाऱ्यांसोबत फरार झाला असून, पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, मंगळवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास योगेश धोंगडे हा त्याच्या शिवाजी नगर परिसरातील घरी आला, त्याच वेळी आरोपी गोलू हा त्याच्या अन्य काही साथीदारांना घेऊन त्याच्या घरात शिरला. यावेळी आरोपींनी योगेशला मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी आरोपी गोलूची पत्नी आणि आईदेखील धावत आल्या, त्यांनी वाद सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर योगेश हा शेजारी असलेल्या नाल्याकडे गेला असता, आरोपींनी योगेशवर चाकूने वार केले. जखमी अवस्थेमध्ये योगेश घराकडे आला, परिसरातील लोकांनी त्याला जवळ असलेल्या एका खासगी रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारादरम्यान योगेशचा मृत्यू झाला.