नागपूर- मित्रांसोबत दारू पीत असताना झालेल्या किरकोळ वादातून तीन मित्रांनी संगनमत करून एका मित्राची हत्या केल्याची घटना राजीवनगर येथील जुन्या जिल्हा परिषद शाळेच्या आवारात घडली आहे. सुरेंद्र आनंद पीलघर (२६) असे मृतकाचे नाव आहे. घटनेची माहिती समजताच एमआयडीसी हिंगणा पोलिसांनी अवघ्या काही तासांत तीनही आरोपींना अटक केली आहे.
किरकोळ वादातून हत्या -
सुरेंद्र आनंद पीलघर याच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी आरोपी निलेश उर्फ गजनी शाहा (१९), अरुण जनमत सिंह (१९) आणि बबलू रामाधर स्लोडिया (२०) यांना अटक केली आहे. मृतक व आरोपी हे सर्व बांधकाम मजूर असून एकमेकांचे निकटवर्तीय होते. मृतक आणि आरोपी नियमितपणे एकत्र दारू प्यायचे. मृतक सुरेंद्र हा भाजीपाला आणण्यासाठी घरून बाहेर पडला होता. मात्र, वाटेत त्याचे दोन मित्र त्याला भेटले. त्यामुळे सुरेंद्र भाजीपाला घ्यायचे विसरून दारू पिण्यासाठी गुत्त्यावर गेला. तिथे तिघेही आरोपी आधीच दारू पीत होते. दारूच्या नशेत मृतक व त्याच्या मित्रांसोबत आरोपींची बाचाबाची झाली. त्यानंतर तिथून सगळे निघून गेले. मात्र, वाटेत जिल्हा परिषद शाळेच्या आवारात आरोपींनी मृतक सुरेंद्रला गाठले आणि धारदार शस्त्राने वार करून त्याची हत्या केली. त्यानंतर सर्व आरोपी घटनास्थळावरून पळून गेले.