नागपूर-लॉकडाऊनच्या निमित्ताने नागपुरात शहरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात असताना सुद्धा एका व्यक्तीची निर्घृण हत्या झाल्याची घटना घडली आहे. सक्करदार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भांडे प्लॉट परिसरात संपत्तीच्या वादातून बाप-लेकाने त्यांच्याच वस्तीत राहणारे हरिभाऊ सावरकर नामक व्यक्तीवर प्राणघातक हल्ला केला, ज्यामध्ये हरीभाऊ सावरकर यांचा मृत्यू झाला आहे.
संपत्तीच्या वादातून बाप-लेकाने केली शेजारी राहणाऱ्या व्यक्तीची हत्या - सक्करदार पोलीस ठाणे
शहरातील वंजारी हॉस्पिटलच्या तळमजल्यावरील दुकानाच्या मालकीहक्कातून झालेल्या वादातून ही घटना घडली आहे.
![संपत्तीच्या वादातून बाप-लेकाने केली शेजारी राहणाऱ्या व्यक्तीची हत्या murder in nagpur for property](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6889012-1091-6889012-1587523529861.jpg)
हरिभाऊ सावरकर यांच्या हत्येनंतर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भांडे प्लॉट चौकात वंजारी हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटलच्या तळमजल्यावर एक दुकान असून ज्याच्या मालकीहक्कावरून बंटी शेख आणि त्याचे वडील नूर शेख या बाप लेकाचा हरिभाऊ सावरकर यांच्याशी वाद सुरू होता. वाद संपत्तीचा असल्याने या संदर्भात पोलिसांकडे तक्रार सुद्धा दाखल करण्यात आली होती.
मंगळवारी सायंकाळी या दोन्ही गटात पुन्हा वाद झाला ज्यातून आरोपी बाप लेकाने हरिभाऊ सावरकर यांच्यावर चाकूने हल्ला केला, ज्यात त्यांचा मृत्यू झाला आहे, त्यानंतर ते दोघेही आरोपी बाप-लेक तिथून पळून गेले. पोलिसांना घटनेची माहिती कळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन आरोपींचा शोध सुरू केला आहे.