नागपूर -सातव्या वेतन आयोगाच्या मागणीसाठी नागपूर महापालिकेचे कर्मचारी, शिक्षक आणि निवृत्त कर्मचाऱ्यांकडून आज एक दिवसीय होम क्वारंटाइन आंदोलन करण्यात येत आहे. आजच्या आंदोलनात अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वगळता मनपाचे २३६८ कर्मचारी सहभागी झाले आहेत. राज्यातील इतर महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळालेला आहे, मात्र नागपूर महानगर पालिकेचे कर्मचारी या लाभापासून वंचित आहेत. त्यामुळे लवकरात लवकर सातवा वेतन आयोग लागू करावा अशी मागणी या कर्मचाऱ्यांनी केली आहे. या कर्मचाऱ्यांकडून आधिच प्रशासनाला आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता.
सातव्या वेतन आयोगाच्या मागणीसाठी नागपूर महापालिका कर्मचाऱ्यांचे आंदोलन - नागपूर महापालिका
सातव्या वेतन आयोगाच्या मागणीसाठी नागपूर महापालिकेचे कर्मचारी, शिक्षक आणि निवृत्त कर्मचाऱ्यांकडून आज एक दिवसीय होम क्वारंटाईन आंदोलन करण्यात येत आहे. आजच्या आंदोलनात अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वगळता मनपाचे २३६८ कर्मचारी सहभागी झाले आहेत. सातव्या वेतन आयोगाचा लाभ लवकरात लवकर मिळावा अशी मागणी या कर्मचाऱ्यांनी केली आहे.
महापालिकेतील कर्मचारी संघटना गेल्या अनेक महिन्यांपासून सातव्या वेतन आयोगाची मागणी करत आहेत. कर्मचाऱ्यांच्या मागणीची दखल घेऊन तत्कालीन आयुक्तांनी वेतन आयोग लागू करण्यासाठी अनुकूलता दाखवली होती. एवढंच नाही तर त्यांनी पुढाकार घेऊन प्रशासकीय प्रस्ताव तयार करून, तो मनपाच्या सभेत मंजुरी करता सादर करण्यात आला होता. मात्र त्यानंतर या विषयावर कोणतीच कारवाई झाली नाही. १ सप्टेंबर २०१९पासून सातवा वेतन आयोग लागू करून थकबाकी टप्प्याटप्प्याने देण्यात येणार होती, मात्र अद्यापही सातवा वेतन आयोगाचा लाभ कर्मचाऱ्यांना मिळाला नसल्याने, कर्मचारी संघटनांकडून आंदोलन करण्यात येत आहे. मागण्या मान्य न झाल्यास आणखी तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा कर्मचारी संघटनांच्या वतीने देण्यात आला आहे.