महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

कोरोना रुग्णांना बेड वाटपासाठी नागपूर मनपाची सीसीआर रूम सज्ज - नागपूर

कोरोना रुग्णांसाठी विविध कोव्हिड रुग्णालयांमध्ये खाटांची सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच विविध कोव्हिड रुग्णालयांमध्ये रेमडेसिवीर, ऑक्सीजन पुरवठयासाठीही वेगळा नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

कोरोना रुग्णांना बेड वाटपासाठी नागपूर मनपाची सीसीआर रूम सज्ज
कोरोना रुग्णांना बेड वाटपासाठी नागपूर मनपाची सीसीआर रूम सज्ज

By

Published : May 7, 2021, 7:16 AM IST

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशानंतर नागपूर महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने सेन्ट्रल कंट्रोल रुम सुरू करण्यात आली आहे. मनपाच्या छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीच्या सहाव्या मजल्यावर ही कंट्रोल रूम असणार असून या माध्यमातून 24 तास सेवा सुरू राहणार आहे. कोरोना रुग्णांसाठी विविध कोव्हिड रुग्णालयांमध्ये खाटांची सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच विविध कोव्हिड रुग्णालयांमध्ये रेमडेसिवीर, ऑक्सीजन पुरवठयासाठीही वेगळा नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

कोरोना रुग्णांना बेड वाटपासाठी नागपूर मनपाची सीसीआर रूम सज्ज
मनपा मुख्यालयात कंट्रोल रूम

मनपा मुख्यालयात सुरु करण्यात आलेली ही कंट्रोल रुम २४ तास सुरु राहणार आहे. येथे मनपा आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वात तीन शिफ्टमध्ये तज्ज्ञांचा चमू उपलब्ध असणार आहे. यानंतर कोणत्याही शासकीय रुग्णालयात तसेच खासगी रुग्णालयात (80% क्षमतेत) अतितातडीचे रुग्ण सोडून थेट रुग्णाला दाखल करता येणार नाही. कंट्रोल रुममधून बेड अलॉटमेंट झाल्यानंतरच रुग्णाला दाखल करता येणार आहे. शिवाय कंट्रोल रुममधून पाठविण्यात आलेल्या कोणत्याही रुग्णांना दाखल करण्यास हॉस्पीटलला नकार देता येणार नाही. हॉस्पीटलमध्ये आयसीयू बेड नसले तरीही रुग्णांवर प्रथमिक उपचार सुरु करता येईल. कंट्रोल रुममधून उपलब्धतेनुसार तातडीने बेड उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न केले जातील. त्यानंतर जेथे बेड उपलब्ध झाला तेथे रुग्णाला ट्रान्सफर करण्याची सोय केली जाणार आहे.

हेल्पलाईनवर संपर्क

कंट्रोल रुमशी संपर्क करावा लागणार असून टेलिफोन क्रमांक ०७१२-२५६७०२१ या नंबरवर १० लाईन उपलब्ध करण्यात आल्या आहेत. तसेच व्हॉटसॲपच्या माध्यमातून रुग्णांची विविध माहिती ७७७००११५३७ आणि ७७७००११४७२ या नंबरवर पाठवयाची आहे. रुग्णांची माहिती दिल्यानंतर रुग्णाचा SPO2 लेवल, एचआरसीटी, आरटीपीसीआर रिपोर्ट या क्रमांकावर व्हॉटसॲपवर पाठवल्यानंतर सॉफ्टवेअरच्या मदतीने रहवासी असलेल्या परिसरात उपलब्धतेनुसार बेड उपलब्ध करुन दिला जाणार आहे. शिवाय रुग्णांना उपचारांचा सल्ला दिला जाणार आहे.

...तर होणार कारवाई

अतिगंभीर स्वरुपातील कोव्हिड रुग्ण दाखल केल्यास एक तासाच्या आत कंट्रोल रुमला याबाबत माहिती देणे संबंधित रुग्णालयास बंधनकारक राहील. तसेच याचा दुरुपयोग केल्याचे लक्षात आल्यास संबंधित हॉस्पीटल आणि संबंधित डॉक्टरवर कारवाई करण्यात येईल असाही इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे. यामुळे नक्कीच याचा सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळेल अशी आशा केली जात आहे. पण यात फोन लावून न उचलण्याचे प्रकार घडू नये अशी आशा व्यक्त केली जात आहे.

आयुक्तांनी घेतला आढावा

नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी गुरुवारी कंट्रोल रुमचा आढावा घेतला. यात यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी शिरीष पांडे, मनपाचे अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा, राम जोशी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर, उपायुक्त श्री. महेश धामेचा, श्री. महेश मोरोणे व सहाय्यक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details