मुंबई - मुंबई उच्च न्यायालयात कोरोना संदर्भातील याचिकांवर आज सुनावणी करताना आज म्यूकरमायकोसिसचा मुद्दा चर्चेत आला. 15 जूनपर्यंत राज्यात 7511 रूग्णांची नोंद झाली. त्यापैकी 4380 जणांवर उपचार सुरू आहेत आणि तसेच गेल्या आठवड्याभरात 'काळ्या बुरशी'मुळे राज्यभरात 75 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सरकारचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणींनी हायकोर्टात दिली. न्यायमूर्ती एस. पी. देशमुख आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर व्हिसीमार्फत सुनावणी पार पडली. तेव्हा, राज्यातील म्युकरमाकोसिसच्या परिस्थितीबाबत हायकोर्टाला माहिती देण्यात आली.
अँम्फोटेरसिन-बी या इंजेक्शनचा 15 जूनपर्यंत एकूण पुरवठा 5 हजार 600 कुप्यांचा करण्यात आला आहे. परंतु प्रत्येक रूग्णाला प्रतिदिवशी किमान चार डोस दिले जातात. त्यामुळे 4 हजार 380 रुग्णांना एकूण 17 हजार 520 कुप्या आवश्यक असून होणारा पुरवठा अपुरा आहे. येत्या काळात हाफकिन बायोफार्माकडून 18 ते 20 जून या कालावधीत राज्य सरकारला अँम्फोटेरसिन-बी च्या 22 हजार कुप्यांचा पुरवठा होणार असून 21 जून ते 30 जून या कालावधीत उर्वरित 18 हजार कुप्या उपलब्ध होणार असल्याची माहिती महाधिवक्त्यांनी हायकोर्टाला दिली.