नागपूर -राज्यात सध्या वीज तुटवडा निर्माण झाल्याने जनतेला लोडशेडिंगच्या ( Maharashtra Load Shedding ) संकटाला तोंड द्यावे लागत आहे. भर उन्हाळ्यात हा लोडशेडिंगचा त्रास नागरिकांना असह्य होत आहे. विजेचा तुटवडा भरून काढण्यासाठी ऊर्जा विभागाचे युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र, एकूण वीज निर्मितीच्या काही टक्के वीज चोरी केली जात आहे. ती रोखण्यासाठी काही प्रमाणात का होईना वीज वाचवली जाऊ शकते. त्याअंतर्गत महावितरणने मागील दोन दिवसांत आकडे टाकून वीज चोरी करणाऱ्या तब्बल २४३ बहाद्दरांवर कारवाई केली आहे. यापूर्वी सुद्धा ४२ आकडे बहाद्दरांविरोधात कारवाई करण्यात आली ( MSEB Remove Illegal Connection ) होती.
मोहीम आणखी तीव्र करणार - महावितरणकडून सुरू करण्यात आलेल्या कारवाईमुळे वीज चोरांचे धाबे दणाणले आहे. महत्वाचे म्हणजे या कारवाईमुळे शहरातील आणि ग्रामीण भागातील काही भाग हे आकडेमुक्त झाले आहेत. आता ही मोहीम आणखी तीव्र करणात येणार आहे. दोन दिवसांत नागपूर परिमंडळात कृषी आणि अकृषी वीज वाहिन्यांवर आकडे टाकून वीज चोरी करणाऱ्या २४३ जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. यात कृषी वाहिन्यांवरील १७३ तर अकृषी वाहिन्यांवरील ७० आकडे बहाद्दरांचा समावेश होता. सर्वाधिक १४९ वीज चोरांवरील कारवाई नागपूरच्या ग्रामीण भागात करण्यात आली आहे.