मुंबई- मनसे कार्यकर्त्यांनी शिवसेना भवनसमोर भोंगा लावून हनुमान चालीसा लावला. सरकारला जाग यावी आणि शिवसेनेला हिंदुत्वाची आठवण यावी याकरिता राम नवमीनिमित्त थेट शिवसेना भवनसमोर मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी भोंगा लावला होता. शिवाजी पार्क पोलिसांनी भोंगा बंद करून यशवंत किल्लेदार आणि चालकाला ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले.
शिवसेनेने हिंदुत्व बासनात गुंडाळलं - मनसे विरुद्ध शिवसेना हा वाद दिवसेंदिवस टोकाला पोहोचत चालला आहे. एकीकडे मनसे शिवसेनेला हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून टार्गेट करत आहेत. मात्र, आता याचा पुढचा टप्पा मनसेने गाठला असून मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी शिवसेना भवनासमोर हनुमान चालीसा व हनुमान पाठ भोंग्यावर वाजवून शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, काही वेळातच पोलिसांनी हस्तक्षेप करत भोंगे ताब्यात घेतले. यासंदर्भात बोलताना यशवंत किल्लेदार म्हणाले की, "काही लोकांनी आपला हिंदुत्वाचा मार्ग सोडून ते बासनात गुंडाळून ठेवलं आहे. आणि त्यांना आठवण करून देण्यासाठी आम्ही आज हा हनुमान चालीसा पाठ करणारा रथ फिरवत आहोत. हा रथ मुंबईत काही ठिकाणी फिरेल. ज्यांना कोणाला हा रथ हवा असेल त्यांना तो मोफत हनुमान चालीसा वाजवण्यासाठी मिळेल."