यवतमाळ -शिवसेनेमध्ये झालेल्या मोठ्या बंडखोरीमध्ये माजी पालिक मंत्री, आमदार संजय राठोडही सहभागी झाले आहेत. त्यामुळे यवतमाळच्या उमरखेडमधील गायत्री चौकात शिवसैनिकांनी त्यांचा निषेध केला. संतप्त शिवसैनिकांनी मंत्री एकनाथ शिंदे ( Shivsena Rebel Leader Eknath Shinde ) व माजी पालक मंत्री संजय राठोड यांची पुतळे ( Agitation Against MLA Rathod ) जाळले. पक्षासोबत गद्दारी करून बंड करण्याऱ्याचं करायचं काय खाली मुंडकं वरती पाय, अशा घोषणा देत शिवसैनिकांनी या नेत्यांच्या प्रतिमांना चपला मारल्या. सर्व शिवसैनिकांनी आपण राज्याचे मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसेच युवासेना प्रमुख पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासोबत असल्याचे सांगितले. या शिवसैनिकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजीही केली.
शिवसैनिक ठाकरेंसोबत -या शिवसैनिकांनी आमदार राठोड यांच्या निषेधार्थ प्रचंड घोषणाबाजी केली. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या समर्थनाच्या घोषणा दिल्या. आपण सर्वजण शिवसेनेसोबत असल्याचे सांगतानाच या शिवसैनिकांनी आमदार राठोड मतदारसंघात आल्यास त्यांना बदडून काढले जाईल, असा इशाराही दिला. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न असून विरोधकांचा हा प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाही, असा विश्वास या शिवसैनिकांनी व्यक्त केला.