नागपूर - भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी पूरग्रस्तांना मदत देण्याची मागणी विरोधी पक्षनेते म्हणून केली असून, त्यांचे ते काम आहे. ते स्वतः मुख्यमंत्री राहिले असल्याने मदत कशी दिली जाते हे त्यांना माहिती असल्याचे राज्याचे मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले. ते नागपुरात बोलत होते.
मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार बोलणे सोप्पे, करणे अवघड -
महापुराला आठ दिवस लोटून गेले असून, अद्याप मदत वाटप न झाल्याने राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ मदत जाहीर करण्याची मागणी राज्य सरकारकडे केली आहे. या मदतीसोबत एनडीआरएफच्या निकषापलीकडे जाऊन मदत करण्याची मागणीही फडणवीस यांनी केली. पण यावर मदत व पुनर्वसन मंत्री वडेट्टीवार म्हणाले की, बोलणे सोप्पे आहे. मदत करताना अनेक अडचणी येतात. पण फक्त बोलून चालत नाही, त्यात अडचणी येतात. फक्त राज्याची नाही तर केंद्र आणि राज्याने मिळून मदत करावी अशी जनतेची मागणी आहे. आम्ही मदत करण्यासाठी निकषांच्या बाहेर जाऊन मदत करण्यास तयार आहोत, असे मंत्री वडेट्टीवार म्हणाले.
ओबीसीला आरक्षण मिळाले पाहिजे -
ओबीसींचा केंद्राकडे असलेला इम्पेरिकल डाटा राज्याला देण्यात यावा आणि आरक्षण टिकावे ही आमची त्यामागची भूमिका आहे. यात राज्य सरकारची भूमिका स्पष्ट आहे. ओबीसीला आरक्षण मिळाले पाहिजे. त्यासाठी आम्ही शेवटच्या टोकापर्यंत लढा देऊन आरक्षण मिळवून देऊ, असेही विजय वडेट्टीवार म्हणाले.