पेट्रोकेमिकल रिफायनरीसाठी केंद्रातून पथक येणार - सुभाष देसाई... - nagpur minister subhash desai news
कोरोना काळातील दोन वर्षात विदर्भाच्या नागपूर आणि अमरावती विभागात एकूण ४४५ हेक्टर जमीम वाटप केली असून याठिकाणी १० हजार ४९ कोटीची गुंतवणुक केली जाणार आहे. लवकरच यातून ३६ हजार ५०६ लोकांना रोजगार निर्मिती होणार आहे. यवतमाळमध्ये आस्ट्रेलियाची एक बहुराष्ट्रीय कंपनी उद्योग उभारणार असल्याची माहिती मंत्री सुभाष देसाई यांनी दिली.
नागपूर - पेट्रोकेमिकल रिफायनरीसाठी राज्य सरकार जमीन किंवा पायाभूत सुविधा देण्याचे काम करणार आहे. पण यात जागेची निवड ही गुंतवणूकदार परदेशी कंपनी आरामको (ARAMCO) करणार असून सोबत केंद्र सरकारच्या पेट्रोलियम विभागाच्या अंतर्गत हे काम होणार आहे. त्यामुळे जागेची निवड राज्यसरकार करणार नसून तिघांच्या एकत्र बैठकीतून ही निवड केली जाणार आहे. पण जागा निश्चिती करण्यासाठी केंद्रातून एक पथक राज्यात येणार असून पथक केव्हा येणार याची वाट पाहत असल्याचेही उद्योग मंत्री सुभाष देसाई म्हणाले. ते पेट्रोकेमिकल रिफायनरी विदर्भात सुरू करावी यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या प्रश्नाच्या उत्तरावर बोलत होते. यावेळी खासदार कृपाल तुमाने हे सुद्धा उपस्थित होते.
विदर्भ नागपूरसाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून पुढे आलेल्या मिहान येथील उद्योग समूहांना सवलतीच्या दरात वीज पुरवठा देण्याची मागणी बैठकीत करण्यात आली. या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी स्पष्ट केले. मिहान परिसरात उद्योग समूह सहभाग वाढविण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून सुरू असून विदर्भातील उद्योगांना चालना देण्यासाठी नागपूर येथे ‘ Advantage Maharastra’ गुंतवणूक मेळावा घेण्याबाबत शासन विचार करत असल्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई म्हणाले.
36 हजार लोकांना मिळणार रोजगार -कोरोना काळातील दोन वर्षात विदर्भाच्या नागपूर आणि अमरावती विभागात एकूण ४४५ हेक्टर जमीम वाटप केली असून याठिकाणी १० हजार ४९ कोटीची गुंतवणुक केली जाणार आहे. लवकरच यातून ३६ हजार ५०६ लोकांना रोजगार निर्मिती होणार आहे. यवतमाळमध्ये आस्ट्रेलियाची एक बहुराष्ट्रीय कंपनी उद्योग उभारणार आहे.
'समृध्दीतुन' विदर्भाच्या उद्योगाला चालना मिळेल -समृद्धी महामार्ग लवकरच पूर्ण होईल. मार्गाच्या बाजूला औद्योगिक क्षेत्र विकसित करण्याचा आराखडा तयार केला जात आहे. त्यामुळे विदर्भाच्या प्रगतीला नक्कीच गती मिळेल अशी आशा आहे. राज्यात सध्या औद्योगिक वसाहतीत किंवा उद्योग समूहात भारनियमन केले जात नाही. सर्वाना आवश्यक वीज पुरवठा होत असल्याचे मंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले.उद्योगमंत्र्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम) संस्थेला भेट दिली. या संस्थेला वाढीव ६० एकर क्षेत्राची गरज आहे. जागा उपलब्धतेबाबत तपासणी करून निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले. मिहान मध्ये प्रमुख अधिकाऱ्यांसोबत बैठकी घेतल्या.