नागपूर -राज्यातील सत्ताधारी आणि विरोधक राजकारणात एकमेकांवर टीका करत निशाणा साधत आहेत. तेच नागपूरला मात्र सत्ताधारी पक्षाचे नेते ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत कशी मैत्री आहे, याबाबत खुलासा केला आहे. अजित पवार यांच्या अर्थ खात्याची फिरकी घ्यायची झाली, तर आपण विरोधी पक्षनेत्यांना चिठ्ठी पाठवून देत असल्याचे त्यांनी मिश्किलपणे सांगितले. त्यानंतर त्यावर कार्यवाही होते, असेही ते म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांच्याशी आमचे ना मनभेद आहेत, ना मतभेद आहेत, असेही नितीन राऊतांनी स्पष्ट केले. त्यामुळे राजकारणात कोणीच कोणाचा कायम शत्रू किवा मित्र नसतो, हे पुन्हा एकदा अधोरेखीत झाले आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची फटकेबाजी -बाबरी मशीद पाडताना मी स्वतः उपस्थित होतो, असा दावा राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. त्यामुळे त्यांच्या वयाबद्दल जोरदार सध्या चर्चा सुरू आहे. त्याला प्रत्युत्तर देताना नागपूरमधील आयोजित एका खासगी कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी चांगलाच टोला लगावला आहे. राज्यातील एक मराठी वृत्तपत्र हे माझ्यापेक्षा (51) एक वर्षाने लहान आहे. सांगण्याचे कारण म्हणजे बाबरी मशीद 1992 मध्ये पडताना मी किती वर्षांचा होतो, यावर देखील वाद सुरू आहे. मी रामजन्मभूमीच्या आंदोलनात होतो, असे म्हणालो, त्यावेळी मी तेरा वर्षांचा होतो, अशी कुणीतरी टीका केली. पण त्यावेळी मी 22 वर्षांचा होतो आणि नगरसेवक होतो असा टोला देवेंद्र फडणीस यांनी लगावत जोरदार प्रतिउत्तर दिले.