नागपूर - सध्याची परिस्थिती पाहता तूर आणि कापूस आदी पीक किती दिवस साथ देतील याची शाश्वती नाही. यामुळे शेतकऱ्यांनी मका पीक घेण्याला प्राधान्य द्यावे, असे आवाहन राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी केले आहे. सध्या दुग्ध उत्पादक क्षेत्रातून मकेची मागणी वाढली आहे. तसेच मकेपासून इथेनॉल निर्मिती करता येईल का? यावर संशोधनाचे काम सुरू आहे. सध्या केंद्रासोबत करार करून साखर कारखान्यांना इथेनॉल निर्मितीला सुरुवात केली आहे. त्याप्रमाणे मका पिकाबाबत ही प्रयत्न करण्यात येत आहेत. जेणे करून ज्याप्रमाणे इंधनाच्या किमती वाढत आहेत. त्याला पर्याय म्हणून इथेनॉलाच वापर वाढवून इंधन दरावर नियंत्रण आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी भविष्यात मका पिकाच्या उत्पादनाकडे वळायला हवे, असे आवाहन मंत्री केदार यांनी केले आहे.
सावनेर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने मका आणि कापूस पिकावरील कीड नियंत्रण याबाबत मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमात बोलताना मंत्री केंदार यांनी शेतकऱ्यांनी मका पिकाचे उत्पादन घेण्याचे आवाहन केले. यावेळी मंचावर जिल्हा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रश्मी बरवे, मनोहर कुंभारे, जिल्हा परिषद कृषी सभापती तापेश्वर वैद्य, सावनेर बाजार समितीचे सभापती बंडू चौधरी, कळमेश्वर बाजार समितीचे सभापती बाबा पाटील यासह शेतकरी उपस्थित होते.