नागपूर- नागपूर शहरामधून वाहणाऱ्या नाग, पिवळी व पोहरा या तिनही नद्यांसह शहर हद्दीतून वाहणाऱ्या सर्व नाल्यांच्या संपूर्ण स्वच्छतेचे कार्य येत्या पावसाळ्यापूर्वीच म्हणजेच ३० मे पूर्वी पूर्ण करा, असे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिले आहेत. नदी व नाले स्वच्छता अभियानांतर्गत सुरू असलेल्या कार्याचा महापौर दयाशंकर तिवारी यांनी मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये व्हर्च्यूअल बैठकीमध्ये आढावा घेतला. यात महापौर दयाशंकर तिवारी व निगम सचिव डॉ. रंजना लाडे उपस्थित होते.
नदीच्या सफाईचे अर्धे काम पूर्ण
प्रारंभी मुख्य अभियंता मनोज तालेवार यांनी झोन निहाय नदी स्वच्छतेच्या कार्याची तर उपायुक्त डॉ.प्रदीप दासरवार यांनी नाले सफाईच्या कार्याची माहिती दिली. आतापर्यंत पोहारा नदीच्या सफाईचे ६५ टक्के काम पूर्ण झाले असून, ३५ टक्के शिल्लक आहे. तर पिवळी नदीची ६० टक्के सफाई झाली असून, ४० टक्के शिल्लक आहे. नाग नदीच्या स्वच्छतेचे ५७ टक्के कार्य झाले, असून ४३ टक्के कार्य शिल्लक आहे.
232 पैकी 125 नाल्यांच्या सफाईचे कामकाज पूर्ण
याशिवाय शहरात एकूण २३२ नाले आहेत. या २३२ नाल्यांपैकी १५५ नाल्यांची मनुष्यबळाद्वारे तर ७७ नाल्यांची मशीनद्वारे सफाई करावी लागते. आतापर्यंत मशीनद्वारे २१ नाल्यांची सफाई पूर्ण झाली आहे. तर मनुष्यबळाद्वारे १०४ नाल्यांची सफाई पूर्ण करण्यात आली आहे. एकूण २३२ पैकी १२५ नाल्यांची सफाई पूर्ण झालेली आहे. सोबतच मोठ्या नाल्यांसाठी मशीनद्वारे काम सुरू आहे. हे सर्व कार्य प्रगतीपथावर असून लवकरच पूर्ण होईल, असा विश्वास प्रशासनाद्वारे व्यक्त करण्यात आला.
गाळ आणि मातीचा उपयोग रस्ते दुभाजकावर झाडे लावण्यासाठी
नदी स्वच्छतेदरम्यान नदीमधून काढण्यात येणारा गाळ, माती तशीच पडून राहू नये याबाबत विशेष काळजी घेण्याच्या सुचना दिल्या आहेत. 'सनदीमधून काढण्यात येणाऱ्या मातीचा उपयोग रस्ता दुभाजकांवर झाडे लावण्यासाठी केला जावा, याशिवाय नदीमधील माती काढण्यासाठी दरवर्षी काही भागातील नदीची सुरक्षा भींत तोडावी लागते हे योग्य नाही. त्यामुळे त्याठिकाणी भींतीला गेट बसवून आराखडा तयार करण्यात यावा', असे सांगण्यात आले.