नागपूर - मैला साफ करणे, घाण डोक्यावरून घेऊन जाणे हे आपल्या समाजात अतिशय कनिष्ठ आणि हीन दर्जाचे काम समजले जाते. तरी सुद्धा हे आमचे पारंपरिक आणि पिढीजात काम म्हणून मेहतर समाजातील बहुतांश लोक गेल्या अनेक पिढ्यानं-पिढ्या हे काम मोठ्या निष्ठेने आजही करीत आहे. मात्र, नागपुराच्या एका सामाजिक संघटनेने पुढाकाराने मेहतर समाजातील शेकडो तरुणांच्या जीवनात उज्वल भविष्याची नवी उमेद निर्माण केली आहे. पारंपरिक कामापेक्षा वेगळं काहीतरी करून सुद्धा जीवन जगता येईल हा आत्मविश्वास निर्माण करून शेकडो तरुणांना लघु उद्योग सुरू करण्यासाठी प्रोत्साहित करत समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले आहेत. त्यामुळेचं आज मेहतर समाजाचे अनेक तरुण लघु उद्योग झाले ( Manual Scavenging People Become Businessman In Nagpur ) आहेत.
नागपूर शहरातील पाचपावली परिसरात मेहतर समाजाची मोठी वस्ती आहे. हजारो लोकांच्या वस्तीत राहणाऱ्या प्रत्येक घरातील एकतरी व्यक्ती मैला स्वछ करणे किंवा साफ सफाईचे कामे करत आला आहे. त्यामुळे त्यांचे हे पिढीजात काम असल्याचं बोललं जातं. मुळात शिक्षणाचा अभावामुळेचं मेहतर समाजातील तरुण आणि तरुणी स्वतःला याच कामात गुंतवून घेतात. मात्र, नागपुरात मेहतर वस्तीत असलेल्या जनजागृती आव्हान नामक संस्थेने ( Jan Jagruti Avhan Samiti ) 2007 सालापासून या वस्तीत राहणाऱ्या तरुण आणि तरुणींना पारंपरिक काम सोडून इतर सन्मानजनक काम सुरू करण्यासाठी प्रोत्साहित करत आहे. त्यामुळेचं आज मेहतर समाजातील शेकडो तरुण मुलांनी स्वतःचा लघु उद्योग सुरू केला आहे. मेहतर समाजातील लोक सध्या करीत असलेल्या पारंपरिक कामाला प्रतिष्ठा नसून इतरही कामे जीवनात आनंद, समाधानासह मोठी प्रतिष्ठा मिळवून देऊ शकतात हा विचार त्यांचा मनात बिंबविण्यात या संस्थेला यश मिळाले आहे.
जन जागृती आव्हान समितीच्या कामाचा घेतलेला आढावा हजारे दाम्पत्याच्या प्रयत्नांना यश - जनजागृती आव्हान समितीचा संस्थापिका प्रीती हजारे, प्रदीप हजारे हे दांपत्य मेहतर समाजात मोठी जनजागृती करीत आहे. घरोघरी जाऊन महिला, पुरुष, युवकांना सध्या करीत असलेले काम आणि त्याचे दुष्परिणाम सांगत आहे. तसेच, घरातील पुरुष, महिला, तरुण आणि तरुणींमध्ये असलेल्या सुप्त गुण ओळखून त्यांना त्यांचा आवडीचा आणि प्रतिष्ठेचा विविध व्यवसायाकडे वळविण्याचे कामे केली जात आहे. जनजागृती आव्हान समिती तर्फे हे काम 2007 पासून सुरू असला तरी अनेक वर्षाचा प्रयत्नानंतर आता कुठे सकारात्मक पावले दिसू लागली आहे. 2015 नंतर समितीचे म्हणणे समाजातील लोकांना समजायला लागले असून, गेल्या काही वर्षात तब्बल 50 युवक आपल्या पारंपरिक व्यवसायाला बाजूला सारून प्रतिष्ठेचे कार्य करायला लागले आहे.
तरुणांच्या हाताला मिळाला रोजगार - सॅम समुद्रे या युवकाने साफ सफाईचे काम सोडून लिरिक्स रायटिंग ( गाण्याचे बोल लिहिणे ) रॅप साँग तयार करने सुरू केले आहे. यातून दर महिन्याला तो 15 ते 20 हजार रुपये कमवून समाजात प्रतिष्ठा मिळविली आहे. याशिवाय सागर कुलटकर, राहुल समुद्रे यांनी जनजागृती आव्हान समितीने केलेल्या मार्गदर्शनाने स्वतःची पॅथॉलॉजी लॅब सुरू केली आहे. या पॅथॉलॉजी क्षेत्रात आपल्या मेहतर समाजातील युवकांना आणण्यासाठी प्रयत्न करीत आहे. याशिवाय उमेश उसरबरसे यांनीही मैल साफ करण्याचे सोडून अगरबत्ती बनविण्याचा छोटा कारखाना उभारला आहे. तर अनेकांनी झाडू बनविण्याचे तंत्र विकसित करून बाजारात तसेच खाजगी कंपन्यांना झाडू बनवून देत आहे. तसेच अनेक जण फिनाईन, हारपीक, भांडे क्लिनर स्कबर, शिवणकाम, ब्युटी पार्लरचे कामे करायला लागले आहे. जनजागृती आव्हान समितीचे हे कार्य मेहतर समाजात सकारात्मक बदल घडवून आणत आहे.
हेही वाचा -Operation Santosh Jadhav : सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी गुजरातेतून उचलले; वाचा सविस्तर, ऑपरेशन संतोष जाधव