नागपूर -पार्किंगच्या वादातून एकाने दुकानाच्या मालकावर बंदूक ताणली असल्याची घटना नागपूर शहरातील जरीपटका पोलीस स्टेशन ( Jaripatka Police Station ) हद्दीत घडली आहे. जरीपटकाच्या तथागत चौकात एक हार्डवेअरचं दुकान आहे. या दुकानाच्या समोर एकाने गाडी आणून उभी केली. दुकानदाराने त्याला गाडी पार्क करण्यास मनाई केली म्हणून दुकानदार आणि गाडी मालक यांच्यात वाद झाला वाद इतका वाढला की कार चालकाने आपल्या जवळची बंदुकच ( Man Pointed Gun Shop Owner ) ताणली. हा सगळा प्रकार पाहून आजूबाजूचे दुकानदार आणि ग्राहक तिथे पोहचले आणि पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी कार मालकावर गुन्हा दाखल केला आहे. आता पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
पार्किंगच्या वादातून ताणली बंदूक -
दुकानासमोर वाहन पार्क केल्याने या संदर्भात जाब विचारणाऱ्या दुकानातील एका कर्मचाऱ्यांवर वाहन चालकाने चक्क बंदूक ताणल्याची खळबळजनक घटना नागपूर शहरातील जरीपटका पोलीस स्टेशन हद्दीत घडली आहे. या प्रकरणी जरीपटका पोलिसांनी वाहन चालका विरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. प्रदीप पाळी असे आरोपी वाहन चालकाचे नाव असून, त्याच्या भावाचा शेजारीच बार आहे.
बघता-बघता वाद गेला विकोपाला -
जरीपटकाच्या तथागत चौकात रूपचंद मुलचंदानी यांचे हिंदुस्थान ट्रेडिंग कंपनी नामक हार्डवेअरच्या सामानाचे दुकान आहे. या दुकानाच्या समोर प्रदीप पाली याने गाडी आणून उभी केली. गाडी अगदी दुकानाच्या शटर समोर उभी केल्याने ग्राहकांना दुकानात येताना त्रास होत असल्याने त्या दुकानातील एका कर्मचाऱ्यांने गाडी प्रदीप पालीला गाडी दुसऱ्या जागी पार्क करण्याची विनंती केली, मात्र गाडी मालकाने या विषयावरून भांडणाला सुरुवात केली. बघता-बघता वाद इतका विकोपाला गेला की कार मालक प्रदीप पाली यांनी त्याच्या जवळ असलेली बंदुकच दुकानातील कर्मचाऱ्यावर ताणली. हा सगळा प्रकार पाहून आजूबाजूचे दुकानदार आणि ग्राहकांनी घटनास्थळी धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळला.
कार मालकावर गुन्हा दाखल -
घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी घेटनेची माहिती जरीपटका पोलिसांना कळवली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन आरोपी कार मालक प्रदीप पाली विरुद्ध गुन्हा नोंद करून तपासाला सुरुवात केली आहे. पोलिसांनी कार सुद्धा जप्त केली आहे.