नागपूर- शहरातील हिंगणा औद्योगीक वसाहतीतमध्ये असलेल्या स्पेसवूड नामक फर्निचर कंपनीला मंगळवारी भीषण आग लागली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या दहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. मात्र, अद्याप आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशामक दलाच्या जवानांना यश मिळाले नाही. ही आग विझविण्यासाठी आणखी तीन तासांपेक्षा जास्त कालावधी लागण्याची शक्यता नागपूर महानगर पालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके यांनी वर्तवली आहे.
स्पेसवूड कंपनीला लागेल्या भीषण आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरूच; जीवितहानी नाही - आगीवर नियंत्रण
स्पेसवूड कंपनीला लागलेली आग अजूनही काही भागात सुरूच आहे, स्पेसवूडच्या गोडावूनमध्ये प्लायवूड सह अन्य ज्वलनशील वस्तूचा साठा आहे,त्या ठिकाणी आग सुरू आहे अग्निशमन दलाच्या दहा गाड्या अविरतपणे आग विझविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आग संपूर्णतः विझवण्यासाठी आणखी काही तास लागण्याची शक्यता असल्याची माहिती अग्निशमन दलाच्या प्रमुख राजेंद्र उचके यांनी दिली आहे.
स्पेसवूड नावाच्या या कंपनीच्या विस्तीर्ण परिसरात अचानक मोठी आग लागली. पाहता पाहता आग कारखान्याच्या अनेक शेड्स मध्ये पसरली, त्यामुळे कंपनीच्या परिसरात एकच गोंधळ उडाला. सर्व कर्मचारी बाहेर पळाले. या कंपनीमध्ये प्लायवूडचे फर्निचर बनवण्याचे काम करते. नागपूरसह संपूर्ण विदर्भात या कंपनीचे फर्निचर पाठवले जातात, त्यामुळे स्पेसवूडच्या आवारात मोठ्या प्रमाणावर लाकडी आणि प्लायवूडचा कच्चा माल साठवलेला होता. या आगीत ते सर्व साहित्य जळून खाक झाल्याची शक्यता आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. सुदैवाने आगीच्या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र कोट्यवधींची आर्थिक हानी झाल्याची शक्यता आहे.
ज्वालाग्रही पदार्थाने भडकली आग
स्पेसवूड कंपनीच्या आत असलेले चारही मोठे शेड्स/ कंपार्टमेंट आगीच्या भक्षस्थानी गेले आहे. फर्निचरसाठी वापरण्यात येत असलेले फेविकोल, थिनर सारख्या ज्वलनशील केमिकलमुळे आग जास्त पसरली. या घटनेत कोट्यवधींचे नुकसान झाले आहे, सुदैवाने अजून ही कोणतीही जीविहानीची माहिती नाही. कंपनीच्या मागिल बाजूला प्लायवुडचा भुसा, ऑइलचा साठा आणि ट्रान्सफॉर्मर असल्याने आग तिथे जाऊ नये हे मोठे या करिता प्रयत्न केले जात आहेत, सध्या तरी आग तिथपर्यंत थांबवण्यात यशस्वी ठरलो आहोत, अशी माहिती अग्निशमन दलाच्या अधिकारी राजेंद्र उचके यांनी दिली आहे.
आग विझवायला आणखी ३ तास किमान लागणार-
आगीचे रौद्र रूप बघता आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाकडून पूर्ण क्षमतेने प्रयत्न केले जात आहेत. महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या तसेच आजूबाजूच्या तालुक्यातील अग्निशमन पथकाच्या गाड्यांना पाचारण करण्यात आले होते, मात्र आगीचे स्वरूप बघता ही यंत्रणा अपुरी पडत असल्याने जिल्ह्यातील अनेक भागातील गाड्या मागवण्यात आल्या आहेत. सध्याच्या परिस्थिती नुसार आग आटोक्यात येण्यासाठी पुन्हा पाच तास लागण्याची शक्यता आहे.