नागपूर - विदर्भात मान्सून अगदी वेळेवर दाखल झाला होता. मात्र, त्यानंतर या १५ दिवसांमध्ये कुठेही मुसळधार किंवा अतिमुसळधार पाऊस व्हावा यासाठी आवश्यक परिस्थिती बंगालच्या उपसागरात तयार झाली नाही. त्यामुळे विदर्भात गेल्या सरासरीपेक्षा तब्बल ३९ टक्के पाऊस कमी झाला असल्याची माहिती प्रादेशिक हवामान खात्याने संचालक मोहनलाल साहू यांनी दिली ( Rainfall 39 Percent Deficiency In Vidarbha ) आहे. अधून-मधून विदर्भातील काही भागात तुरळक पावसाची नोंद होत आहे. तरी अद्याप सर्वदूर पाऊस झालेला नाही.
बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याशिवाय विदर्भात सर्वदूर पाऊसाची शक्यता नाही. मान्सूनचे आगमन झाल्यानंतर गेल्या पंधरा दिवसांमध्ये एकदाही बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा तयार झाला नाही. त्यामुळे विदर्भात पावसाची टक्केवारी मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. या शिवाय हवेची दिशा देखील वारंवार विस्कळीत होतं असल्याने पाऊसाचे प्रमाण कमी झाले आहे. मलेशिया, बर्मा या भागातून समुद्री वादळ आल्यास बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा तयार होतो. त्यामुळे सुद्धा विदर्भात पाऊस पडण्यास मदत मिळेल, अशी माहिती मोहनलाल साहू यांनी दिली आहे.
प्रादेशिक हवामान विभाग संचालक माहिती देताना जुलै महिन्यात दमदार पावसाचा अंदाज - जुलै महिन्यात सर्वात जास्त पाऊस होतो, अशी शक्यता असते. त्यामुळे या महिन्यात बंगालच्या खाडीत किमान दोन ते तीन वेळा कमी दाबाचे पट्टे (लो प्रेशर एरिया) तयार झाल्यास जून महिन्यातील पावसाचा अनुशेष भरून निघेल. मात्र, पुढील काही दिवसांमध्ये अशी परिस्थिती निर्माण होईल, असे कोणताही सिस्टीम तयार होईल, अशी शक्यता दिसत नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
विदर्भातील कोणत्या जिल्ह्यात किती पाऊस -अकोला जिल्हात 105 मिलिमीटर पाऊस झाला आहे. त्यानुसार अकोल्यात 27 टक्के कमी पाऊसाची नोंद झाली आहे. तर, अमरावती मध्ये आत्तापर्यंत केवळ 91 मिलिमीटर इतका पाऊस झाला असल्याने येथे देखील 39 टक्के कमी पाऊसाची नोंद आहे. भंडाऱ्यामध्ये 41 टक्के कमी पाऊस झाला तर बुलढाण्यात ही टक्केवारी 24 टक्यांवर आहे. चंद्रपूरमध्ये आत्तापर्यंत 121 मिलिमीटर पाऊस झाला असून, येथे देखील 36 टक्के कमी पाऊस पडला आहे. याशिवाय गडचिरोली येथे 117 मिलिमीटर पाऊसाची नोंद झाली असून, तब्बल 47 टक्के पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. वर्धामध्ये सुद्धा हीच परिस्थिती असून, सामान्यपेक्षा 47 टक्के पाऊस कमी झाला आहे. गोंदियामध्ये 30 टक्यांनी पाऊस झाला असून, नागपुरात हे प्रमाण 31 टक्के इतके आहे. विदर्भात सर्वात कमी पाऊस हा यवतमाळ जिल्ह्यात झाला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील 51 टक्के कमी पावसाची नोंद आहे.
हेही वाचा -Heavy rain in Mumbai : मुंबईत मुसळधार पाऊस; रस्ते तुंबले, जनजीवन विस्कळीत