नागपूर - महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाकडून घेतल्या जाणाऱ्या बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. त्यात नागपूर विभागाने समाधानकारक कामगिरी केल्याचे दिसून येत आहे. २०१९पेक्षा २०२० या वर्षातील कामगिरी सुधारल्याचे दिसत आहे. नागपूर विभागातून गोंदिया जिल्ह्याने ९४.१३ टक्के गुण घेत बाजी मारली आहे. तर सर्वात कमी कामगिरी ८७.४० टक्के इतकी वर्धा जिल्ह्याची आकडेवारी आहे.
प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. यात राज्यात नागपूर विभागाने ९१.६५ टक्के गुण घेत समाधानकारक कामगिरी केल्याचे दिसून आले. संपूर्ण नागपूर विभागात एकून ६ जिल्हे आहेत. यापैकी गोंदिया जिल्ह्याने यावर्षी बाजी मारल्याचे दिसून येत आहे. गोंदिया जिल्ह्याने नागपूर विभागातून सर्वाधिक ९४.१३ टक्के गुण घेत आपला झेंडा रोवल्याचे दिसून आले. तर सर्वात कमी ८४.४० टक्के इतक्या गुणातच वर्ध्याला समाधान मानावे लागले. दरम्यान बारावीच्या निकालाची उत्सुकता आणि धाकधूक पालक आणि विद्यार्थ्यांना लागली होती. त्यामुळे निकाल जाहीर होताच विद्यार्थ्यांनीदेखील सुटकेचा नि: श्वास सोडल्याचे दिसून आले.