नागपूर -शहरात मागील तीन दिवसांपासून बिबट्याचा वावर असल्याने दहशत निर्माण झाली आहे. यात वनविभाग त्याच्या माघावर असताना बिबट्या त्यांना हुलकावणी देत आहे. सोमवारी दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास महाराज बाग प्राणी संग्रहालयात महिला काम करत असताना हा बिबट बागेच्या मागील बाजूस वाहणाऱ्या नाल्याच्या भिंतीवर दिसून आला. यामुळे पुन्हा खळबळ उडाली असून शोध मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे.
बिबट्याने केली शिकार -
वन विभागाने या नाल्याच्या आतील भागात जाण्यास मनाई केली आहे. तर बिबट्याने महाराज बाग परिसरात डुकराची शिकार केली असून त्याने काही भाग खाल्ला आहे. या परिसरात वन विभागाने आता ट्रॅप कॅमेरे लावण्याचे काम सुरू केले आहे. तर चार पिंजरे लावण्यात आले आहेत. अशी माहिती वनविभागाने दिली आहे.
वन विभागाने कसून शोधमोहीम सुरू -
हा बिबट्या आता वर्दळीच्या ठिकाण शहराचे हृदयस्थान असलेल्या बर्डी भागात पोहचल्याने भीती निर्माण झाली आहे. यामुळे वन विभागाने हा परिसर पिंजून काढला आहे. महाराज बाग परिसरात शहरातून वाहणारा नाला परिसर झुडपांचा असल्याने तो दिसण्यास अडचण निर्माण झाली आहे. पण ता मात्र भीती वाढली असल्याने वन विभागाने कसून शोधमोहीम सुरू केली असून या भागात आता पिंजरा लावून पकडण्यासाठी तयारी सुरु केली आहे.
तीन दिवसांत आयटी पार्कपासून महाराज बाग परिसरात -
नागपूर शहरातील आयटी पार्क परिसरात गायत्री नगरात हा बिबट पहिल्यांदा शुक्रवारी सकाळी पावणे दहाच्या सुमारास नरेंद्र चाकोले यांना दिसला होता. त्यानंतर वन विभागकडून त्या परिसरात शोध मोहीम दिवसभर राबवण्यात आली. पण बिबट्या दिसून आला नाही. पण शनिवारी पाहाटे मध्यरात्री अडीचच्या सुमारास ट्रस्ट नामक कंपनीच्या सुरक्षा रक्षकांना दिसला. यावेळी तो सीसीटीव्ही दिसल्याने त्याचा वावर असण्याला शिक्कामोर्तब झाला. पण त्यानंतर जवळपास 21 ट्रॅप कॅमेरे लावून शोधण्याचा प्रयत्न सुरू झाला होता. पण अद्यापही तो ट्रॅप कॅमेरात आला नाही.