नागपूर : आगामी काळात राज्यात अनेक महानगरपालिका, नगर पालिका आणि जिल्हा परिषदांसह स्थानीक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. या निवडणुकांमध्ये जास्तीत-जास्त महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येतील अशा प्रकारच्या प्रभाग रचना आणि गट तयार करण्यात आले आहेत असा गंभीर आरोप केला आहे भाजप नेते आणि विधानपरिषद आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी ते आज नागपुरात पत्रकार परिषदेत बोलत होते.
जाणीवपूर्वक अधिकाऱ्यांवर दबाव : अधिकाऱ्यांवर दबाव आणून जाणीवपूर्वक सदोष प्रभाग रचना तयार करण्यात आली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या विरोधात निवडणूक आयोगाला पत्र पाठवण्यात आले असून पुन्हा नव्याने प्रभाग रचनेची तपासणी करावी आणि जनतेच्या हरकतींची सूनवाई व्हावी अशी मागणी केल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
जिल्हा परिषद निवडणुकीत आघाडीचे निर्णय चुकीचे : राज्य निवडणूक आयोग यांच्या आदेशानुसार भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 243 के आणि महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम 1961 मधील तरतुदीनुसार जिल्हा परिषद पंचायत समिती यांची गट व गण रचना करण्यात येते. तसेच भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 243 झेड ए मधील तरतुदीनुसार महानगरपालिका नगरपरिषदा नगरपंचायती आणि निवडणूक प्रभाग रचना केल्या जात असते. त्याच प्रकारे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम नुसार ग्रामपंचायत वॉर्ड रचना करण्यात येते. या प्रभाग व वॉर्ड रचना तयार करताना महाराष्ट्र विकास आघाडी शासनाने नियमांना डावलून महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत, जिल्हा परिषद, गट गण रचना चुकीने तयार केल्याचे निदर्शनास आल्याचा आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.