नागपूर - आरक्षणाच्या मुद्यावरून मराठा समाज काही दिवसांपासून आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. मात्र मराठा आंदोलकांच्या तोंडाला पाने पुसण्याचं काम राज्य शासनाने केले आहे. शिवाय आरक्षणासाठी काढलेला शासन निर्णय देखील संभ्रमित करणारा आहे, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. नागपुरात पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शिवाय ओवैसी यांनी केलेल्या हिंदूत्वाच्या ट्विटवरही त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
कोणत्याही धर्माला कमी लेखणं चुकीचं -
हिंदूत्वाच्या मुद्दावर एमआयएमचे अध्यक्ष ओवैसी यांनी केलेल्या विधानावर बोलताना आंबेडकर म्हणाले कि, कोणत्याही धर्माबद्दल असे विधान करणे चुकीचे आहे. शिवाय पुरातन काळापासून जे संत वैदिक परंपरांना मानणारे होते. त्यांचा पुढे हिंदूमध्ये समावेश झाला. त्यामुळे असे वक्तव्य हे समाजामध्ये विघटन घडवणारे आहे. असेही यावेळी प्रकाश आंबेडकर म्हणाले.
वंचित बहुजनचे नेते प्रकाश आंबेडकर असदुद्दीन ओवैसींचे ट्विट -
राजकीय शक्ती एकाच धर्माकडे किंवा समाजाकडे राहील या खोट्या धारणेवर हिंदुत्वाची प्रतिमा उभी केली आहे. शिवाय मुस्लिमांना राजकारणात भाग घेण्याचा कोणताही हक्क असू नये, असंही त्यातून दर्शवण्याचा खोटा प्रयत्न आहे. संसद किंवा विधिमंडळातील आमचं संख्याबळ हे हिंदुत्व आणि संघाला आव्हान आहे. आमचं अस्तित्व रोखल्यास संघ नक्कीच त्याचा उत्सव साजरा करेल”, असंही ट्विट ओवैसींनी केलं होतं. त्यानंतर मोठा गदारोळ झाला होता. प्रकाश आंबेडकरांनीही ओवैसींचं हे विधान खोडून काढलं आहे.
मराठा समाजासह अन्य समाजावरही अन्याय -
राज्य शासनाकडून मराठा समाज व इतरही समाजावर अन्याय होत आहे. मराठा आंदोलकांनी उभारलेल्या लढ्याला आणि आंदोलकांच्या तोंडाला शासनाने पाने पुसली आहेत, असा आरोप वंचित बहुजनचे प्रकाश आंबेडकर यांनी केले आहेत. काही दिवसापूर्वीच राज्य शासनाकडून मराठा आरक्षणाबाबत शासन निर्णय जारी करण्यात आले आहेत. त्यात मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्क लागू केले जाईल, असे उल्लेख करण्यात आले आहेत. याचे आम्ही स्वागत करतो. परंतु मराठा आरक्षणाचा मुद्दा हा कोर्टात अडकलाय. त्यामुळे यावर्षी तो लागू होईल किंवा नाही हे सांगता येत नाही. अशावेळी हा निर्णय संभ्रमित करणारा ठरत आहे, असेही आंबेडकर म्हणाले.
सरकारकडून मराठा आंदोलकांची फसवणूक -
शिवाय मराठा विद्यार्थ्यांना लागू करण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती व शिक्षक शुल्क याचा अर्थसंकल्पातही समावेश झाला आहे. परंतु या निर्णयात बदल करून १६% आरक्षणात येणाऱ्या मराठा समाजाला बाजूला ठेवत या १६ टक्केत न येणाऱ्या मराठा समाजाला आरक्षण लागू करा. परंतु शासन हा निर्णय लागू करत नसल्याचेही यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. मराठा आरक्षणावरून शासन मराठा आंदोलकांची फसवणूक करत आहे, असा घणाघातही आंबेडकरांनी केला.