नागपूर -सरकारकडून विरोधकांची मुस्कटदाबी सुरू आहे. आम्ही विचारलेल्या कोणत्याही प्रश्नाचं समाधानकारक उत्तर देण्यात येत नाही. शेतकऱ्याना मदत न मिळाल्याने शेतकरी आम्हाला बाहेर प्रश्न विचारतात. त्यामुळे अशा परिस्थितीत सभागृहात राहण्यास कोणताच अर्थ नाही. त्यामुळे विधानपरिषदेत विरोधकांना सभात्याग करावा लागला, असे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी सांगितले.
हेही वाचा... CAA Protest Live: देशभर हिंसक आंदोलन; लखनौमध्ये गोळी लागून एकाचा तर मंगळूरमध्ये 2 जणांचा मृत्यू
राज्यातील शेतकरी मागील चार दिवसांपासून अधिवेशनातून काहीतरी मिळेल या अपेक्षेने आस लावून बसला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये देण्याची ग्वाही महाविकास आघाडी सरकारने केली होती. मात्र शेतकऱ्याच्या तोंडाला नुसती पाने पुसली जात आहे. सरकारकडून केवळ राजकीय भाषण देणे सुरू आहे. याकरता सरकारचा धिक्कार करत आम्ही सभात्याग केला आहे. त्यामुळे या सरकारकडून शेतकऱ्यांना काहीतरी मिळेल, अशी अपेक्षा करणे चूक असल्याचा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी येथे केला.