मुंबई - महापालिकेच्या 'केईएम' रुग्णालयात दोन महिन्याचा प्रिन्स हा बालक शॉर्टसर्किटने भाजल्याने त्याचा हात कापावा लागला आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी महापालिका प्रशासनाने समिती नेमली असून रुग्णालयाचे अधिष्ठाता, डॉक्टर, परिचारिका आणि रुग्ण सहाय्यक (वॉर्डबॉय) अशा २५ जणांची चौकशी होणार आहे. या चौकशीचा अहवाल येत्या दोन ते तीन दिवसात सादर केला जाणार आहे.
'केईएम' रुग्णालयातील 'प्रिन्स' प्रकरणी २५ जणांची चौकशी मुंबई महापालिकेची केईएम, नायर, सायन, कूपर अशी मोठी रुग्णालये आहेत. याठिकाणी चांगले उपचार होत असल्याने उपचार घेण्यासाठी देशभरातून रुग्ण येत असतात. उत्तर प्रदेश येथून केईएम रुग्णालयात हृदयाचा उपचार करण्यासाठी प्रिन्स नावाच्या दोन महिन्याच्या बालकाला भरती करण्यात आले होते. उपचार सुरु असताना ईसीजी मशीनमध्ये शॉर्टसर्किट होऊन गादी जळाल्याने प्रिन्सचा हात, कान, डोक्याचा आणि छातीचा भाग जळाला. त्याच्या हाताला गँगरिग झाल्याने त्याचा हात कापण्यात आला. या प्रकरणाचे पडसाद पालिकेच्या स्थायी समितीत आणि सभागृहात उमटले. यावेळी रुग्णालयाचे अधिष्ठाता, डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांच्या निलंबनाची आणि प्रिन्सच्या कुटुंबीयांना १० लाख रुपये मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे.
हेही वाचा -पत्रकारांवर बंदी घालणाऱ्या केईएमच्या अधिष्ठात्यांची चौकशी करा, महानगरपालिका विरोधी पक्षनेत्याची मागणी
याप्रकरणाची पालिका प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून रुग्णालयाचे संचालक डॉ. रमेश भारमल यांच्याकडून चौकशी केली जात आहे. रुग्णालयात प्रिन्सचे उपचार सुरू असताना पहाटे अडीचच्या सुमारास ईसीजी मशीनमध्ये शॉर्टसर्किट होऊन आग लागली. त्यात गादी जळाली. त्यात प्रिन्स भाजल्यावर त्याच्या वडिलांनी एक तासांनी आम्हाला माहिती दिल्याचे म्हटले आहे. आग लागली तेव्हा गादी जळेपर्यंत त्या ठिकाणी डॉक्टर, परिचारिका, रहग्ण सहाय्यक (वॉर्डबॉय) यापैकी कोणीही कर्मचारी नसल्याचा आरोप होत आहे.
हेही वाचा -प्रिन्स प्रकरणाचे गूढ वाढले..! नातेवाईकांना भेटण्यास केईएम प्रशासनाकडून मज्जाव
आग लागली त्यावेळी संबंधीत डॉक्टर आणि कर्मचारी कुठे होते? ज्या मशीनमुळे आग लागली ती मशीन कधी आणली? त्या मशीनची देखभाल केली गेली का? देखभाल विभागाने त्याकडे दुर्लक्ष केले का? रुग्णालयात असा प्रकार घडला असताना रुग्णालयाचे अधिष्ठातांचे त्याठिकाणी लक्ष होते का? याची चौकशी केली जात आहे. याप्रकरणी २५ जणांची चौकशी केली जात असून त्याचा अहवाल येत्या दोन दिवसात प्रशासनाला सादर केला जाईल.