नागपूर -ओडिसातून रेल्वेने नागपुरात येऊन चोरी करणाऱ्या सराईत चोराला नागपूर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. प्रशांतकुमार कराड असे या चोराचे नाव असून त्याने शहरात तब्बल 16 ठिकाणी चोऱ्या केल्याचे उघड झाले आहे. महाराष्ट्रासह इतर राज्यातही प्रशांत आणि त्याच्या टोळीने चोऱ्या केल्या आहेत. पोलिसांनी प्रशांतकडून 38 लाख रुपये किमतीचे 951 ग्राम सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. पोलिसांनी त्याच्या आणखी एका मित्राला अटक केली आहे.
कायदा सुव्यवस्थेबद्दल गंभीर प्रश्नचिन्ह -नागपूर शहरातच्या अनेक भागात गेल्या काही महिन्यांपासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. विशेषतः प्रतापनगर, बेलतरोडी, जरीपटका पोलीस ठाण्य़ाच्या हद्दीत चोऱ्या आणि घरफोडीच्या घटना वाढल्या होत्या. घरातील नागरिक घरात झोपले असताना देखील चोरीच्या घटना घडत असल्याने उपराजधानीतील कायदा सुव्यवस्थेबद्दल गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण होत होता. चोरी आणि घरफोडीच्या अनेक तक्रारी येत असल्याने पोलिसांवर देखील चोराला लवकर जेरबंद करण्यासाठी दबाव वाढला होता. मात्र, अनेक पोलीस स्टेशनचे पथक प्रयत्न करूनही चोरट्यांना जेरबंद करण्यात हतबल ठरत होते.
अखेर चोर लागला पोलिसांच्या हाती - प्रतापनगर पोलीस ठाण्यात दिपाली पातोडे यांनी चोरीची एक तक्रार दाखल केली. त्याचा तपास करत असताना रात्रीच्या वेळी त्रिमूर्ती नगर परिसरात एका घरात चोर शिरल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्या घराच्या अवतीभवती शोध सुरू केला असता त्या घरातून पळून जाताना एक संशयास्पद तरुण पोलिसांच्या नजरेस पडला. त्याला पकडून पोलिसांनी विचारपूस केली असता तो उडवाउडवीची उत्तर देत असल्याने पोलिसांचा संशय बळावला. त्यानंतर पोलिसांनी त्याला खाक्या दखवताच त्याने स्वतःचे नाव प्रशांत कुमार कराड असे सांगत चोरीची कबुली दिली.