नागपूर- हेमंत नामदेवराव नगराळे हे नाव आज राज्यातील प्रत्येकाला परिचयाचे झाले आहे. कारण ही तसेच आहे. हेमंत नगराळे यांच्याकडे मुंबई पोलीस दलाचे प्रमुख म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे. हेमंत नगराळे हे चंद्रपूर आणि नागपूरच्या मातीत घडले असल्याने त्यांना मिळालेल्या जबाबदारीमुळे नागपूर, चंद्रपूरसह संपूर्ण विदर्भाचा मान वाढला आहे. अँटिलिया स्फोटक प्रकरणानंतर मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणामुळे मुंबई पोलीस दल बदनामीच्या गर्केत अडकले असताना त्यातून बाहेर काढण्याची जबाबदारी ही हेमंत नगराळे यांच्यावर आली आहे, त्यामुळे त्यांची नियुक्ती फार महत्वाची मानली जाते आहे. हेमंत नगराळे यांची मुंबई पोलीस दलाचे आयुक्त म्हणून नियुक्ती झाल्याने त्यांच्या नागपुरातील निवासस्थानी आनंदाचे वातावरण आहे. त्यांनी केलेल्या मेहनतीचे फळ आज त्यांना मिळाल्याची प्रतिक्रिया त्यांचे ज्येष्ठ बंधू दिलीप नगराळे यांनी ईटीव्ही भारतकडे बोलून दाखवली आहे. दिलीप नगराळे कुटुंबीयांशी आमचे प्रतिनिधी धनंजय टिपले यांनी खास बातचीत करून हेमंत नगराळे यांचा आजवरचा प्रवास जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.
हेमंत नगराळे यांच्या कुटुंबीयांसोबत बातचीत.. हेमंत नगराळे यांनी ठरवलेली गोष्ट पूर्ण केल्याशिवाय ते स्वस्थ बसत नाहीत. त्यांनी केलेला निर्धार हा पूर्णत्वास गेल्यानंतर ते मोकळा श्वास घेतात, अशी काहीशी प्रतिमा हेमंत नगराळे यांची आहे. अतिशय जिद्दी स्वभावाचे हेमंत हे शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळखले जातात. आज त्यांना मिळालेल्या जबाबदारीमुळे दिलीप नगराळे यांनी त्यांच्या भुतकाळातील आठवणीना उजाळा दिला. मुन्ना याच नावाने नगराळे कुटुंबीय हेमंत यांना ओळखतात.
हेमंत संयमी आणि ध्येयवादी - दिलीप नगराळेहेमंत अगदी बालपणापासूनच संयमी आहे. अभ्यासात हुशार असल्याने तो सर्वांचा लाडका. ठरवली गोष्ट पूर्ण करण्यासाठी कितीही मेहनत घेण्याची हेमंतची तयारी असायची. रात्रंदिवस अभ्यास करून तो पोलीस अधिकारी झाला आहे. त्याचे हे यश बघून मन भरून येत असल्याची भावना दिलीप नगराळे यांनी बोलून दाखवली.
हेमंत कराटेचे प्रात्यक्षिक माझ्यावर करायचा -हेमंत नगराळे हे महाविद्यालयात असताना त्यांनी कराटेच्या क्लासेसमध्ये प्रवेश घेतला होता. यावेळी त्यांचा क्लासमध्ये गुरुजींनी शिकवलेली एक-एक स्टेप ते माझ्यावर प्रात्यक्षिक म्हणून करायचे. हे सांगताना दिलीप नगराळे यांचे मन भरून आले.
हेमंत यांचा स्वभाव रागीट होता -हेमंत नगराळे यांच्या वहिनी देवयानी नगराळे यांनी देखील त्यांच्याकडे असलेला आठवणींचा खजिना ईटीव्हीकडे खुला केला. ते केवळ आणि केवळ अभ्यासात रमायचे त्यांना इतर कुठल्याही गोष्टीत त्यांना स्वारस्य नव्हते. ते आधीपासूनच शिस्तप्रिय असल्यामुळे त्यांच्या स्वभावात रागीटपणा असला तरी त्यांना लहान मुले फार आवडतात. माझी तिन्ही मुले त्यांच्या अंगाखांद्यावर खेळताना मोठी झाल्याचे देवयानी नगराळे यांनी सांगितले. घरचा जबाबदार व्यक्ती म्हणून त्यांचा वावर असायचा. त्यांचे संपूर्ण लक्ष घरात असायचे कुणाला काय हवे, नको याची काळजी त्यांनी सदैव घेतल्याचे त्यांनी सांगितले.
काका आमच्यासाठी प्रेरणादायी- जेव्हापण माझे काका हेमंत यांच्याशी बोलणे होते, तेव्हा ते आम्हाला प्रोत्साहित करत असतात. एक मार्गदर्शक म्हणून त्यांनी नेहमीच आम्हाला मार्गदर्शन केले, अशी भावना हेमंत नगराळे यांचे पुतणे अजिंक्य नगराळे यांनी व्यक्त केली आहे.
हेमंत नगराळे यांचा जीवन प्रवास -हेमंत नगराळे यांचा जन्म चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यात झाला. सुरुवातीला सातवी पर्यंतचे शिक्षण त्यांनी भद्रावती येथीलच जिल्हा परिषद शाळेत घेतले. त्यानंतर त्यांचे संपूर्ण कुटुंबीय नागपूरला स्थायिक झाल्यानंतर पुढील शिक्षण त्यांनी पटवर्धन हायस्कूलमध्ये झाले. बारावीनंतर त्यांनी प्रसिद्ध व्हीएनआयटी म्हणजेच विश्वेश्वरय्या प्रोद्योगिकी अभियांत्रिकी महाविद्यालयातून मेकॅनिकल इंजिनिअरची पदवी प्राप्त केली. त्यानंतर लगेचच त्यांनी खापरखेडा विद्युत केंद्रात नोकरी स्वीकारली होती. तिथे काही काळ नोकरी केल्यानंतर त्यांना भंडारा येथील ऑर्डनन्स डिफेन्स फॅक्टरीमध्ये चांगल्या पदावर नोकरी मिळाली. याच दरम्यान हेमंत नगराळे यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेत बाजी मारल्यामुळे त्यांची आयपीएस म्हणून नियुक्ती झाली. त्यांचा हा प्रवास वाटतोय इतका सोपा कधीच नव्हता. हेमंत नगराळे यांचे ध्येय निर्धारित होते. ठरवलेल्या ध्येला गवसणी घालण्यासाठी त्यांनी कष्ट करायला कधीही कंजूसी केली नाही. त्यामुळेच आज त्यांना मुंबई पोलीस दलाचे प्रमुख म्हणून ओळख मिळाली आहे.