नागपूर - नागपूर रेडलाईट वस्ती हटवण्याच्या मुद्यावर वातावरण तापले आहे. वस्ती उठवणे आणि खुली करणे, या दोन्ही बाजूचे आंदोलन समोरा समोर आले. गंगा जमुना समोरच्या मुख्य रस्त्यावर आज (रविवारी 22 ऑगस्ट) रोजी चांगलाच राडा पाहायला मिळाला.
हेही वाचा -'त्या' दोन खासदारांविरोधातील याचिका नागपूर खंडपीठाने फेटाळली
नागपूरच्या इतवारा परिसरात गंगा जमुना वस्ती खुली करण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्या ज्वाला धोटे, तर दुसरीकडे गंगा जमुना वेश्या व्यवस्याय हटाव कृती समितीकडून राष्ट्रवादीच्या प्रदेश सरचिटणीस या रस्त्यावर उतरल्या. आज दोन्ही गटाकडून समर्थन आणि विरोध प्रदर्शन सुरू असताना अचानक वातावरण तापले. गंगा जमुना समोरून जाणाऱ्या मुख्य मार्गावर दोन्ही बाजूचे आंदोलन हे समोरा समोर आल्याने गोंधळ उडाला. दोन्ही गट धक्काबुक्की करत एकमेकांच्या अंगावर जात असताना पोलिसांनी त्यांना रोखून धरले. दोन्ही गटाकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. जवळपास दीड ते दोन तास हा संघर्ष सुरू राहून दोन्ही गट मागे हटायला तयार नसल्याने पोलिसांची दमछाक होत होती. बराच वेळ तणावाच्या वातावरणानंतर पोलिसांनी दोन्ही बाजूच्या आंदोलकांना मागे हटवले.
पोलिसांनी केली वस्ती सील
गंगा जमुना वस्ती म्हणजेच रेड लाईट एरिया असून जवळपास 200 वर्षांपासून या भागात देहव्यापर सुरू असल्याचा दावा वारांगणा यांच्याकडून केला जात आहे. पण कालांतराने परिसराचे स्वरुप वाढले असून जवळपास 12 एकराच्या परिसरात अनेक घरांमध्ये हा देहव्यापार चालत आहे. पण याच वस्तीत मोठ्या प्रमाणात अवैध धंदे ज्यामध्ये अमली पदार्थांची विक्री केली जात आहे. यासोबत अनेक गुन्हेगारांचा वावर या भागात असून या देह व्यापारामध्ये अल्पवयीन मुलींना जोर जबरदस्तीने आणले जात असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे पोलिसांनी या वस्तीवर एक वर्षासाठी बंदी आणली आहे. हा भाग बॅरिकेटिंग करत पूर्ण परिसर सील करण्यात आला आहे. तसेच स्थानिक नागरिकांनी सुद्धा या वस्तीत चालत असलेल्या देह व्यापरामुळे परिसरात राहणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास होत असल्याचे म्हणत वस्ती उठवण्याची मागणी केली आहे.
वारांगणाच्या समर्थनात आंदोलन
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अर्बन सेलच्या अध्यक्षा, तसेच विदर्भ अन्याय निवारण समितीच्या अध्यक्षा ज्वाला धोटे यांनी वारांगणांच्या समर्थनात आंदोलन सुरू केले आहे. पोलिसांनी बंद केलेली गंगा जमुना वस्ती पुन्हा सुरू करण्याची मागणी केली. 15 ऑगस्टलासुद्धा पोलिसांनी लावलेले बॅरिकेटिंग तोडून आंदोलन करण्यात आले होते. ज्वाला धोटे यांचे वडील माजी खासदार कै. जांबुवंतराव धोटे यांना वारांगणा या राखी बांधत असत. यामुळे आज ज्वाला धोटे यांनीही राखी बांधून घेत त्यांच्या रक्षणार्थ रस्त्यावर उतरणार असल्याची भूमिका स्पष्ट केली. यानंतर त्यांनी मुख्य रस्त्यावर लागलेले बॅरिकेटिंग हटवण्याची मागणी केली. त्यानंतर त्या मुख्य रस्त्यावर आल्या.