नागपूर - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू म्हणून जन्माला आलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही, असा संकल्प 1935 मध्येच केला. त्यानंतर तब्बल 21 वर्ष विविध धर्माचा अभ्यास करून 14 ऑक्टोबर 1956 ला नागभूमीत दीक्षा घेतली. याच जागेला आज दीक्षाभूमी अशी ओळख मिळाली. पण दीक्षाभूमीची जागा कशी आणि कोणी निवडली. याबदद्दल दीक्षाभूमी स्मारक समितीचे सचिव डॉ. सुधीर फुलझेले यांच्याकडून जाणून घेऊया दीक्षाभूमीच्या स्तूपाच्या इतिहास या खास रिपोर्टमधून...
नागपूर जिल्ह्यात दीक्षाभूमीला लाखो लोक नतमस्तक होतात. याठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थीवर 120 मीटर उंच स्तूप बांधण्यात आले आहे. तसेच भगवान बुद्धाची मूर्ती इथे आहे. पण स्तुपाचा इतिहास आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्यासाठी जागेची निवड करण्याचाही एक वेगळा इतिहास आहेत. तात्कालीन उपमहापौर दिवंगत सदानंद फुलझेले हे वयाच्या 28 व्या वर्षात असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संपर्कात आले. त्यावेळी सदानंद फुलझेले, वामनराव गोडबोले, रेवाराम कवाडे यांना बौद्ध धर्माची दीक्षा घेणार असल्याने त्यासाठी जागेची निवड करण्याची जवाबदारी देण्यात आली. यात ऑक्टोबरमध्ये दीक्षा होणार असल्याने त्यावेळी पाऊस राहू शकेल म्हणून चिखल होऊ नये यासाठी अनेक जागा पाहून बाद करण्यात आल्यात. त्यानंतर उंच असलेला भाग म्हणून आजच्या दीक्षाभूमीची जागा ठरली. दुसरे म्हणजे ही जागा सरकारी असल्याने त्याला भविष्यात धर्माच्या प्रचारासाठी मिळावी म्हणून त्या दृष्टीने मिळवण्यास सोपी जाईल यासाठी ही जागा निवडण्यात आली.
अशी मिळाली जागेला मंजुरी -डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा माहापरिनिर्वाण झाल्यानंतर या जागेवर त्यांचे स्मारक व्हावे यासाठी अनुयायांकडून प्रयत्न सुरू झाले. अनके वर्षाचा संघर्ष सुरू राहिला. एकदा पंडित जवाहरलाल नेहरू आणि यशवंतराव चव्हाण हे नागपूरात आले असतांना त्यांना दीक्षाभूमीच्या जागेला मंजुरी देण्याची विनंती केली. तेव्हा मागणी केलेली जागा कोणाची आहे, अशी विचारणा झाली. यावर जागा राज्य सरकारची असल्याचे सांगण्यात आले. त्यावर पंडित नेहरू यांनी "जगह राज्य सरकार की है तो यशवंतराव दे देंगे" असे म्हणत होकार दिला आणि जागेचा प्रश्न मिटला.