नागपूर -केंद्र शासनपुरस्कृत राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत दिला जाणारा सन २०१७-१८ च्या कायाकल्प पुरस्काराची घोषणा राज्यसरकारने केली होती. राज्यस्तरावरील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार नागपूर महानगरपालिकेअंतर्गत संचालित इंदोरा प्राथमिक आरोग्य केंद्राने पटकाविला असून द्वितीय पुरस्कार फुटाळा प्राथमिक आरोग्य केंद्राने पटकाविला आहे. अन्य दोन आरोग्य केंद्रांना प्रोत्साहन पुरस्कार प्राप्त झाला. या सर्व चमूंना महाल येथील श्रीमंत राजे रघुजी भोसले नगर भवन येथे आयोजित समारंभात पुरस्कार प्रदान करण्यात आले.
नागरिकांचा विश्वास संपादन करण्यासाठी नगरसेवकांची मदत घ्यावी-
कोव्हिड काळातही मनपाच्या आरोग्य यंत्रणेने उत्तम कार्य केले. यासोबतच अनेक राष्ट्रीय कार्यक्रम आहे. मनपाचा आरोग्य दूत हा शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचतो. परंतु कोव्हिडमुळे नागरिकांच्या मनात भीती कायम आहे. आता कुष्ठरोग आणि क्षयरोगाचे सर्व्हेक्षण आरोग्य चमूतर्फे सुरू आहे. मात्र, नागरिक याचा संबंध कोव्हिडशी जोडून सर्व्हेक्षणाला सहकार्य करीत नसल्याचे लक्षात आले. आरोग्य चमूने नागरिकांचा विश्वास संपादन करण्यासाठी नगरसेवकांची मदत घ्यावी, असे आवाहन कार्यकारी महापौर मनीषा कोठे यांनी आरोग्य अधिकारी-कर्मचाऱ्यांना केले.
प्रत्येक केंद्राने पुरस्कार प्राप्त करावा- आयुक्त
नागपुरात २६ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. या स्पर्धेत राज्यभरातील अनेक नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र सहभागी झाले. नागपूर महानगरपालिकेने १९ जून २०१७ रोजी यात सहभाग घेतला. याच काळात आरोग्य यंत्रणेचा कायापालट करण्यासाठी टाटा ट्रस्ट सोबतीला आली. टाटा ट्रस्टने प्रत्येक कर्मचाऱ्यांना पायाभूत प्रशिक्षण दिले. यामुळे आरोग्य केंद्रांचा कायापालट होतानाच सेवेतही आमूलाग्र बदल झाला.