नागपूर - नागपूरसह विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांसाठी आवश्यक ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. मुबलक प्रमाणात ऑक्सिजन पुरवठा व्हावा यासाठी प्रशासनाने आता ओडिशा राज्यातून ऑक्सिजनची आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी बुधवारी वायूदलाच्या विशेष विमानाने नागपूर येथून ऑक्सिजनचे रिकामे टँकर रवाना झाले आहेत. पुढच्या 24 तासानंतर रेल्वेने हे टँकर नागपुरात पोहोचणार आहेत.
भिलाई येथून 110 मॅट्रिक टन ऑक्सिजन नागपूरला पुरवठा होत आहे. पण ऑक्सिजनची वाढती गरज आणि मागणी पाहता आता ओडिशा राज्यातून ऑक्सिजनची गरज भागवली जाणार आहे. यासाठी वायु दलाच्या विशेष विमानाने ऑक्सिजन वाहतूक करणारे टँकर रवाना झाले. पुढील 24 तासात भुवनेश्वर नजीकच्या अंगुळ येथील स्टील प्लांट येथून नागपूरला ऑक्सिजन मिळणार आहे. त्यामुळे विदर्भातील काही जिल्ह्यात ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होणार आहे.
नागपूरला 1 मे रोजी 93 मेट्रिक टन, 2 मे रोजी 220 मेट्रिक टन, 2 मे रोजी 111 मेट्रिक टन, 4 मे रोजी 60 मेट्रिक टन तर पाच मे रोजी 118 मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा झाला आहे. नागपूर शहरातील वाढती मागणी, शिवाय नागपूर ग्रामीण व अन्य जिल्ह्याला देखील ऑक्सिजनचा पुरवठा केल्या जात आहे. तरीही ऑक्सिजन साठा अपुरा पडत आहे. यासाठी केंद्राच्या वायू दलाच्या विशेष विमानाची मदत जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. त्यासाठी आवश्यक असणारे टँकर वायुदलाच्या महाकाय विमानाने रवाना झाले. सर्व टँकर रेल्वेने आणले जाणार आहे.