नागपूर -नागपूरच्या रामटेक विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार आशिष जैस्वाल ( Independent MLA Ashish Jaiswal ) सुरुवातीलाच बंडखोर एकनाथ शिंदे गटात सहभागी झाले आहेत. मात्र, आज त्यांच्या विरोधात रामटेक येथे शिवसेनेकडून जोरदार आंदोलन करण्यात आले आहे. यावर आशिष जैस्वाल यांनी ईटीव्ही भारतकडे आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. मी अपक्ष आमदार असल्यामुळे शिवसेनेला माझ्या विरोधात आंदोलन करण्याचा स्वातंत्र आहे. मात्र त्यांचे आंदोलन अवैध असल्याचे आशिष जैस्वाल म्हणाले आहेत. लोकांनी मला निवडून दिले आहे. त्यामुळे मला माझं समर्थन कुणाला द्यायचे हे ठरवण्याचा अधिकार माझ्याकडे असल्याचे आशिष जैस्वाल यांनी सांगितले आहे. माझ्या मतदारसंघाच्या विकासासाठी जे फायद्याचे असेल तो निर्णय मी घेण्यासाठी समर्थ आहे आणि माझ्या मागे माझ्या मतदारांचा पूर्ण पाठिंबा असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
'महाविकास आघाडीत आमदारांची गळचेपी' :शिवसेनेत आमदारांची कशाप्रकारे गळचेपी होत आहे, हे कुणापासून लपलेले नाही. शिंदे गटातील सर्व आमदारांची एकच मागणी आहे की आमहाला आता महाविकास आघाडीत राहायचे नाही. ज्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीला राज्याच्या जनतेने विरोधी पक्षात बसण्याचा जनादेश दिला आहे. त्यांच्यासोबत सत्ता स्थापन करणे हे आम्हाला मान्य नव्हते. परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या इच्छे खातर आम्ही अडीच वर्षे गप्प राहिलो. मात्र आता गप्प राहता येणार नाही. त्यामुळे आम्ही महाविकास आघाडीतून बाहेर पडलो, असल्याची माहिती आशिष जैस्वाल यांनी दिली आहे. न्यायालयाचा जो निर्णय येईल तो आम्हाला मान्य असेल असे देखील त्यांनी सांगितले आहे.