नागपूर - मागील काही दिवसात कोरोनानंतर म्यूकरमायकोसिस या बुरशीजन्य आजाराने थैमान घातले आहे. दुसऱ्या लाटेत पोस्ट कोविड रुग्णांमध्ये हा आजार बळावला असताना रेमडेसिवीरच्या तुटवड्यानंतर फंगल इन्फेक्शनसाठी अँटी-फंगल इंजेक्शन ‘अम्फोटेरिसिन-बी’ची मागणी वाढली आहे. त्यामुळे या इंजेक्शनचा काळाबाजार सुरू झाल्याने तुटवडा निर्माण झाला आहे.
सध्याच्या काळात कुठल्याही इंजेक्शनची मागणी वाढली की त्याची संधीसाधू लोक काळाबाजार करायला सुरुवात करतात. यात म्यूकरमायकोसिसचे रुग्ण वाढल्याने त्यावरील ‘अम्फोटेरिसिन-बी' या इंजेक्शनची मागणी वाढली आहे. हे इंजेक्शन 2600 रुपयांच्या घरात मिळत असताना आता काळाबाजार करत दुप्पट पेक्षा जास्त किमतीत हे इंजेक्शन विकले जात आहे. या प्रश्नाकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.