नागपूर - येत्या 24 तासांत नागपूरसह विदर्भात तापमान वाढीस सुरुवात होईल, असा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवला ( Increase More Temprature Vidarbha ) आहे. उत्तरेतील राजस्थानकडून दक्षिणेकडे वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यांची दिशा बदलल्यामुळे दोन दिवस नागपूर आणि विदर्भातील तापमानात घट नोंदवण्यात आली होती. तर, काही भागात अवकाळी पाऊस देखील कोसळला होता. मात्र, पुन्हा एकदा उष्ण वारे दक्षिणेकडे वाहू लागल्याने विदर्भाला उन्हाचे चटके सहन करावे लागतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून नागपूरसह विदर्भात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. त्याचा थेट परिणाम हा तपमानावर झाला आहे. राजस्थानकडून वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यांनी दिशा बदलली होती. त्यामुळे विदर्भात ढगाळ वातावरण तयार झाले होते. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला होता. पण, हा दिलासा केवळ दोनच दिवस टिकला. राजस्थानकडून वाहणाऱ्या उष्ण वारे पुन्हा विदर्भाच्या दिशेने वाहू लागल्यामुळे येत्या 24 तासांत तापमान वाढीस सुरुवात होईल, असा अंदाज हवामान विभागाचे अधिकारी एम.एल.शाहू यांनी व्यक्त केला आहे.