नागपूर - शेतजमिनीच्या वादातून सावकाराची पत्नी आणि कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्याच्या पत्नीमध्ये शाब्दिक चकमक उडाल्यानंतर झटापट झाल्याचा एक व्हिडिओ सध्या वायरल होत आहे. ही घटना नागपूर जिल्ह्याच्या भिवापूर तालुक्यातील वाकेश्वर येथील आहे. २०१७ साली कथित सावकार आणि शेतकरी यांच्यातील कर्ज प्रकरणातून ही घटना घडल्याचे बोलले जात आहे. शेतकरी दाम्पत्याने या घटनेची तक्रार केल्यानंतरही पोलिसांनी या घटनेत कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.
भिवापूर तालुक्यातील वाकेश्वर गावातील शेषराव चौधरी या शेतकऱ्याने उमरेड येथे राहणारे सावकार अभयचंद्र पाटील यांच्याकडून 2 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. कर्ज घेताना शेषराव चौधरी यांनी आपली दोन एकर शेती त्याच्याकडे गहाण ठेवली होती. मात्र, सावकाराने शेतकऱ्याला न कळता त्याची जमीन गहाण न ठेवता धोक्याने आपल्या नावाने रजिस्ट्री करून घेतल्याचा आरोप तक्रारदार शेतकरी चौधरी यांनी केला आहे.
नागपुरात सावकाराच्या पत्नीकडून शेतकऱ्याच्या पत्नीला अर्धवस्त्र करुन धक्काबुक्की दोन वर्षानंतर जेव्हा शेतकरी कर्जाची रक्कम घेऊन गेला त्यावेळी या सावकाराने जमीन आपल्या मालकीची असल्याचे सांगितले.
हेही वाचा...धक्कादायक...! ठाण्यात तरूणाला विवस्त्र करून मारहाण; दोन जणांना अटक
यावर्षी लवकर पाऊस दाखल झाल्यामुळे शेतकऱ्याने पत्नीसह शेतात जाऊन पेरणी केली. मात्र, या सावकाराने २० जून रोजी ट्रक्टरने शेतकरी दाम्पत्याने केलेली पेरणी नष्ट केली. तसेच सावकाराने दोघांना शेतात येण्यास मज्जाव केला. सावकाराच्या पत्नीने शेतकऱ्याच्या पत्नीला मारहाण केली, असा आरोप शेतकऱ्याच्या पत्नीने केला आहे. सावकार आणि तिच्या पत्नीने माझ्या अंगावरील साडी काढल्याचाही आरोप शेतकऱ्याच्या पत्नीने केला आहे.
दरम्यान या घटनेच्या तीन दिवसानंतर शेतकरी दाम्पत्याने याबाबत भिवापूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती. मात्र, तरिही पोलिसांनी अद्यापपर्यंत गुन्हा दाखल केलेला नाही. व्हिडीओमध्ये या घटनेत शेतकऱ्याचा आवाज देखील ऐकू येत आहे. तर दुसरीकडे तीन दिवसानंतर शेतकरी दाम्पत्याने या घटनेची तक्रार दाखल केली असल्याने पोलीस व्हिडिओमधील घटनेची सत्यता तपासूनच कारवाई करणार आहेत.