नागपूर- विदर्भातील नागपूर जिल्हा मध्यप्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमेवर आहे. याठिकाणी आंतराज्यीय चेकपोस्ट कार्यरत आहेत. मात्र, येथील चेक पोस्टवर गुंडांनी कब्जा केल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. नागपूरच्या सीमेवर केळवद, खुर्सापार आणि कांद्री चेकपोस्टवर आहेत, त्या सर्व पोस्टवर गुंड प्रवृत्तीचे लोक वाहनांना थांबवतात आणि प्रत्येक ट्र्क चालकांकडून प्रत्येक फेरीसाठी एक हजार रुपयांची अवैध वसुली करत असल्याचा प्रकार समोर आला आहे. मात्र, ट्रक चालकांकडून होत असलेल्या लुटीकडे प्रादेशिक परिवहन विभाग दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे.
महाराष्ट्राच्या आंतरराज्य सीमेवरचे असलेल्या या चेकपोस्टवर येणाऱ्या ट्र्क आणि इतर कमर्शीयल / वाणिज्यिक वाहनांचे ते घेऊन जात असलेल्या वजनासह वजन केले जाते. स्वयंचलित वजन काट्यावर वाहनाच्या वजनाची नोंद होत असतानाच डिजिटली त्या वाहनाच्या परवाने आणि इतर कागदपत्रे तपासले जातात. जर वाहनांमध्ये वजन जास्त असेल तर परिवहन अधिकाऱ्यांनी त्या वाहनाला नियमाप्रमाणे दंड लावणे अपेक्षित असते. आणि वजन नियमाप्रमाणे असेल तर त्या वाहनाला पुढे जाऊ दिले पाहिजे असे नियम आहे. मात्र, सर्वांना एकच नियम लावून रोज लाखो रुपयांची अवैध वसुली केली जात आहे.