नागपूर - काँग्रेसचे अध्यक्ष पद स्वीकारण्यासाठी राहुल गांधी यांनी अद्याप होकार दर्शवला नाही. त्यामुळे राहुल गांधी यांची अध्यक्ष होण्याची इच्छा नसेल तर त्याऐवजी प्रियंका गांधी यांनी ते पद स्वीकारावे, अशी मागणी काँग्रेसचे महासचिव तथा माजी आमदार आशिष देशमुख यांनी केली आहे. ते नागपुरात वनराई फाउंडेशनच्या वतीने आयोजित इंदिरा गांधी यांचे वनसंरक्षणावर योगदान या कार्यशाळेनंतर प्रसारमाध्यमांशी बोलत होते. माजी आमदार आशिष देशमुख हे नेहमी आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. यावेळी त्यांनी चक्क काँग्रेसच्या राहुल गांधी यांनी मोठी लढाई लढली असून, आता पक्षाची सूत्रे प्रियंका गांधी यांनी स्वीकारावीत या वक्तव्याने चर्चेत आले आहेत.
पुढील आठवड्यात अखिल भारतीय काँग्रेस कमिटीची बैठक होणार आहे. लोकशाहीत विरोधी पक्षाची भूमिका ही म्हत्वाची असते. त्यामुळे खऱ्या अर्थाने आज देशात विरोधी पक्षाच्या भूमिकेत चांगले काम करू शकत असेल तर तो काँग्रेस पक्ष आहे. सोनिया गांधी यांची वयानुसार प्रकृती ठीक नसते. त्यामुळे काँग्रेसचे अध्यक्षपद प्रियंका गांधी-वडेरा यांनी स्वीकारावे आणि होऊ घातलेल्या सीडब्ल्यूसीच्या बैठकीत हा निर्णय व्हावा. यात काँग्रेसच्या तमाम कार्यकर्त्यांची ही इच्छा आहे. कॉंग्रेस कमिटीच्या सर्व वरिष्ठ सदस्यांनी त्याला पाठिंबा द्यावा, या देशाच्या प्रभावी नेत्या म्हणून त्या ठरू शकतात, असेही देशमुख म्हणाले.
हे ही वाचा -खुशखबर..! निवासी डॉक्टरांना मिळणार प्रत्येकी १ लाख २१ हजार रुपय
कॉंग्रेसला एकसंघ ठेवून नेतृत्व करण्याची ताकद गांधी घराण्यात -
काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी घराणेशाही पद्धत का, असे विचारले असता माजी आमदार आशिष देशमुख म्हणाले, की कन्याकुमारीपासून लडाखपर्यंत काँग्रेसला एकसंघ ठेवण्यासाठी नेतृत्व मान्य असेल तर गांधी घरण्याचेच मान्य होईल असेही ते म्हणालेत. काँग्रेस हाच देशाला विकासाच्या दिशेने 100 पाऊले पुढे नेऊ शकेल. त्यामुळे प्रियंका गांधी यांनीच अध्यक्षपद स्वीकारावे, अशी मागणी केली.
हे ही वाचा -परमबीर सिंह यांना 12 ऑक्टोबरला चौकशीसाठी हजर राहण्याबाबत गुन्हे शाखेने बजावली नोटीस
प्रियंका गांधी इंदिरा गांधींप्रमाणें रणरागिणी आहेत-
इंदिरा गांधी यांनी वन संवर्धनासाठी महत्वाचे काम केले आहे. त्याच पद्धतीने आजच्या परिस्थितीत काँग्रेस संवर्धनाचे काम जर कोणी करू शकत असेल तर प्रियंका गांधीच करू शकतील. त्यांनी पूर्णकालीन अध्यक्ष व्हावे, ही मागणी नागपुरातून करत असल्याचेही आशिष देशमुख म्हणाले. प्रियंका गांधी यांची कार्यशैलीही इंदिरा गांधी प्रमाणेच आहे. लखीमपूरच्या घटनेत मध्यरात्री तीन वाजता प्रियंका गांधींनी पोलिसांशी भिडून रणरागिणी बनत शेतकऱ्यांच्या मदतीला धावून गेल्या. या देशाला काँग्रेसच वाचवू शकतो आणि प्रियंका गांधी यांच्या नेतृत्वात ते शक्य होऊ शकेल, असा विश्वास काँग्रेसचे नेते आशिष देशमुख यांनी व्यक्त केला आहे.