नागपूर -महानगर पालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे आज मुंबईसाठी रवाना झाले आहेत. याआधी त्यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून नागपूरकारांचे आभार मानत निरोप घेतला आहे. आज ते नागपूर सोडणार असल्याने समर्थकांनी त्यांच्या शासकीय निवासस्थानासमोर गर्दी केली होती. 'मुंढे तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ है' च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता
तुकाराम मुंढे याची काही दिवसांपूर्वीच मुंबईला बदली झाली होती. सध्या ती रद्द करण्यात आली असून ते नव्या नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. मुंढे नुकतेच कोरोनाच्या संक्रमाणातून मुक्त झाले आहेत. नागपूर सोडण्यापूर्वी अनेकांनी मला भेटण्याची इच्छा व्यक्त केल्याचे त्यांनी म्हटले. अनेकांनी मला भेटण्याचा प्रयत्नही केला. मात्र वेळे अभावी प्रत्येकाला भेटणं शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले.
सर्व निर्णय जनतेच्या हितासाठी घेतल्याचे समाधान
नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून कर्तव्य बजावताना सात महिन्यांचा काळ माझ्यासाठी खूप काही शिकवणारा ठरला, असे मत त्यांनी व्यक्त केले. महामारीच्या निमित्ताने मनपा आयुक्त म्हणून जे अधिकार प्राप्त झाले, त्या अधिकाराचा उपयोग उत्तम पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला. प्रसंगी कठोर निर्णय घेतले. त्यावर टीका झाली. मात्र, प्रत्येक निर्णय हा जनतेच्या भल्यासाठी घेतला याचे समाधान नक्कीच आहे. या काळातील अनुभव आयुष्यभरासाठी शिदोरी म्हणून कामात येईल, यात शंका नाही. जे-जे चांगले शिकायला मिळाले, ते शिकलो. काही कटू अनुभव असतीलही; मात्र त्यातूनही बोध घेतला. नव्या ठिकाणी रुजू होण्यासाठी मुंबईला रवाना होतोय. जेथे कुठे असेल, आपले प्रेम कायम सोबत असेल. या शहरासाठी काही चांगले करण्याचा प्रयत्न केला, याचा अभिमान असेल. नागपूर महानगरपालिकेतील कटू-गोड आठवणींसह मनपाला गुड बाय! आपण सर्वांनी जी साथ दिली त्याबद्दल धन्यवाद!