नागपूर -पोलिसांमधील माणूसकी पुन्हा एकदा समोर आली आहे. ज्यामुळे पोलीस आणि नागरिकांमधील संबंध आणखी दृढ व्हायला मदत मिळणार आहे. पोलीस उपायुक्त लोहित मतानी आणि त्यांच्या पथकाला रूट मार्च करताना एका निराधार वृद्ध महिलेच्या पडक्या घरात पाणी गळत असल्याचं लक्षात आलं. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता, स्वखर्चाने ताडपत्री विकत आणून त्या महिलेच्या घरावर टाकली. या ताडपत्रीमुळे घरात गळणारे पाणी थांबले असून, महिलेची समस्या मार्गी लागली आहे. अचानक घडलेल्या या सुखद घटनेमुळे नर्मदा बावनकुळे यांना अश्रू अनावर झाले.
गुन्हेगारांच्या मनात कायद्याची भीती आणि सामान्य नागरिकांच्या मनात आदर कायम रहावा या करता पोलिसांकडून कायद्याची कडक अंमलबजावणी करताना कधी कधी असा प्रसंग पुढे येतो, की त्यातून मार्ग काढल्याशिवाय मन स्वस्थच बसू देत नाही. पण ज्यावेळी ते काम मार्गी लागतं तेव्हा आत्मीय सुखाची अनुभूती होते, अशी प्रतिक्रिया लोहित मतानी यांनी दिली आहे.
निराधार महिलेला पोलिसांकडून मदतीचा हात पोलिसांची महिलेला मदत
गेल्या काही दिवसांपासून पोलीस उपायुक्त लोहित मतानी यांच्या नेतृत्वाखाली झोन ३ अंतर्गत असलेल्या विविध भागात रूट मार्च काढण्यात येतो आहे. गुन्हेगारी घटनांना चाप बसावा यासाठी हा रूट मार्च काढण्यात येतो. अशा प्रकारच्या रूट मार्चचे आयोजन काल सायंकाळी शांतीनगर भागात करण्यात आले होते. रूट मार्चदरम्यान लोहित मतानी यांच्या नजरेस एका निराधार वृद्ध महिलेचे मोडके-तोडके कवलारू घर पडले. घराची अवस्था फारच बिकट होती. पाऊस सुरू असल्याने पाणी त्या महिलेच्या घरात गळत होते. त्यामुळे घरात जणू पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. हे बघून लोहित मतानी यांनी या महिलेला मदत करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आपल्या सहकार्यांसोबत याबाबत चर्चा केली. व नंतर स्वखर्चाने एक ताडपत्री आणून या महिलेच्या घरावर टाकली. यामुळे घरात घुसनारे पाणी बंद झाले असून, महिलेने पोलीस कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत.
महिलेच्या डोळ्यात आनंदाश्रू
नागपूर शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेल्या नागपूर पोलिसांना वेळ प्रसंगी कठोर भूमिका सुद्धा घ्यावी लागते, त्यामुळे जनसामान्यांमध्ये पोलिसांच्या प्रति आदर कायम आहे. पावसाच्या पाण्यात घर दहा ठिकाणी गळत असल्याने निराधार वृद्ध महिला नर्मदा बावनकुळे या हताश झाल्या होत्या, मात्र अचानक पोलिसांनी त्यांची समस्या मार्गी लावल्याने त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.
हेही वाचा -दोन बायका फजिती ऐका.. नवरा २ बायकांसोबत राहणार ३-३ दिवस, रविवारी आईवडिलांसोबत