नागपूर - संपूर्ण देशाला हाद्रवणारी घटना शुक्रवारी नागपूरमध्ये घडली. एका माथेफिरूने चक्क यूट्यूब आणि क्राइम शो बघून हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पीपळा फाटा या भागात राहणाऱ्या बांधकाम व्यावसायिक राजू वैद्य यांच्या कुटुंबातील सहा सदस्यांना बंदूक आणि चाकूचा धाक दाखवून बंधक केले होते. आरोपीने अतिशय सूक्ष्म अभ्यास करून हा संपूर्ण कट रचला होता. मात्र, पोलिसांनी देखील अभेद्य किल्ला भेदून सर्व बंधकांची मुक्तता केली आहे. अंगावर काटा येईल असा वेगळा अनुभव नागपूर पोलिसांकरिता होता. संपूर्ण ऑपरेशनचा थरार गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त गजानन राजमाने यांनी ईटीव्ही भारत सोबत शेअर केला आहे. संपूर्ण घटनाक्रम ऐकताना प्रत्यक्ष घटनास्थळी आपण असल्याचा भास झाल्याशिवाय राहणार नाही.
ओलीस नाट्या मागील पटकथा : यूट्यूब आणि क्राईम शो बघून रचला कट,मात्र पोलिसांच्या कौशल्यापुढे आरोपीचं फुलफ्रुप प्लॅनिंग फेल असा प्रसंग जीवनात एकदवेळाच येतो - डीसीपी राजमाने
एका २० वर्षीय तरुणाने बंदूक आणि चाकूच्या धाकावर एका कुटुंबाला ओलीस ठेवल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त गजानन राजमाने यांना समजली तेव्हा हातचे सारे कामं बाजूला सारून त्यांनी घटनास्थळ गाठले. परिस्थितीचे गंभीर लक्षात घेऊन त्या घराचा नकाशा तयार करवून घेतला, ज्यानंतर सुरू झाले ऑपरेशन लाइफ सेवर. वरच्या माळावर वैद्य कुटुंबातील तीन सदस्य असल्याची माहिती त्यांना समजली, त्यांनी गुंडाचा भीतीने स्वतःला खोलीत कैद करून घेतले होते. त्या तिघांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्याची योजना आखण्यात आली, कुठल्याही वस्तूचा आवाज न करता पहिली मोहीम फत्ते झाल्यानंतर डीसीपी गजानन राजमाने यांनी स्वतः घरात प्रवेश करून आरोपीवर झडप घालून त्याला अटक केली. या संपूर्ण ऑपरेशन संदर्भात बोलताना ते म्हणाले, की असा प्रसंग पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्याच्या जीवनात क्वचितच येतो, अंगावर खाकी वर्दी घातल्यानंतर प्रत्येकाच्या जीवनाचे रक्षण करणे कर्तव्यच नाही तर ध्येय समजून मी ऑपरेशनचे नेतृत्व केले आणि त्यात यशस्वी झालो, या पेक्षा मोठे समाधान नाही. त्यावेळी वैद्य कुटुंबातील सदस्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले तेव्हा आमचे देखील मन भरून आल्याची कबुली त्यांनी दिली.
घटनाक्रम -
पिपळा फाटा या परिसरात राहणारे राजू वैद्य यांच्या कुटुंबीयांवर हा प्रसंग ओढवला होता. सुमारे तीन तास हे ओलीस नाट्य सुरू होते. राजू वैद्य हे बांधकाम व्यावसायिक आहेत. दुपारी अडीचच्या सुमारास आरोपी बंदूक आणि चाकू घेऊन त्यांच्या घरात शिरला. त्याने वैद्य कुटुंबीयांतील 6 जणांना घरात ओलीस ठेवले. त्यानंतर 50 लाख रुपयांची खंडणी मागितली. दरम्यान या घटनेची माहिती पोलिसांना दिल्यावर पोलिसांनी आरोपीला अटक करण्यासाठी नियोजन केले. वरच्या माळ्यावरून घरात शिरत आगोदर तीन जणांची सुटका केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला सिनेस्टाइल अटक केली. लुटारूला गाफील ठेवण्यासाठी आणि त्याने घरच्यांना इजा करू नये यासाठी सुरुवातीला लुटारूला तीनदा खंडणी म्हणून दोन लाख रुपये दिले. दरम्यान पोलिसांना वेळ मिळाला आणि त्याच्या अंगावर जाळी टाकून त्याला अटक केली. आता या आरोपीची चौकशी सुरु आहे. आरोपीचे नाव जितेंद्र बिसेन असे आहे.