नागपूर -वाढत्या अवैध भूमाफिया व गुंड प्रवृत्तीच्या गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी गृहमंत्री व नागपूर पोलिसांकडून विशेष तक्रार निवारण उपक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे. नागपुरातील पोलीस जीमखाना येथे या उपक्रमाची गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या उपस्थितीत सुरुवात करण्यात आली आहे. यात शहरातील भू माफियांविरोधात नागरिकांकडून करण्यात आलेल्या तक्रारींचे निवारण करण्यात येत आहे.
नागपुरात गृहमंत्र्यांच्या हस्ते विशेष तक्रार निवारण उपक्रमाला सुरुवात पहिल्या टप्प्यात ५० तक्रारदारांच्या तक्रारींचे निवारण करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, आजपासून या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली असून, टप्प्याटप्प्याने शहरातील अशा तक्रारींचे निवारण करण्यात येणार आहे.
हेही वाचा -मेडिकल रुग्णालयातुन पळाला खुनाचा आरोपी; शोध सुरू
शहरातील वाढते भू विषयक गुन्हे लक्षात घेता व भू माफियांविरोधातील तक्रारी पाहता, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काही दिवसांपूर्वीच याबाबत एसआयटी स्थापन करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर आता या विशेष तक्रार निवारण उपक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे. शहरातील अवैधपणे चालणारे कारभार व नागरिकांच्या समस्या पाहता नागपूर पोलिसांकडे अशा प्रकरणाच्या तक्रारी कराव्या. असे आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले होते. त्यानंतर या आवाहनाला नागपूरकरांनी चांगलाच प्रतिसाद दिल्याचे दिसून आले.
या तक्रार निवारण उपक्रमाच्या पहिल्या टप्प्याला आजपासून सुरुवात करण्यात आली आहे. यात पहिल्या ५० तक्रारदारांच्या भू विषयक, गुन्हे विषयक तक्रारींचा समावेश करण्यात आला आहे. त्या तक्रारींचे प्रत्यक्ष वाचण करून संबंधित अधिकाऱ्यांमार्फत निवारण करण्यात येत आहे. या उपक्रमासाठी नागपूर पोलीस आयुक्त अमितेश कुमारसह सर्वच संबंधित अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. शिवाय या विशेष तक्रार निवारण उपक्रमात जवळजवळ ३०० पेक्षा अधिक तक्रारी दाखल झाल्याची माहिती आहे. त्यामुळे आजपासून सुरू झालेल्या या उपक्रमाद्वारे पुढील काही दिवसात सगळ्या तक्रारी निकाली लागतील, असे पोलीस विभागाकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे शहरातील वाढती गुन्हेवृत्ती रोखण्यासाठी गृहमंत्री व नागपूर पोलिसांकडून या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे. याला नागरिकांचाही चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.