नागपूर - कोरोनाची तिसरी लाट आल्यास उद्योग, व्यवसाय, व्यापार सुरळीत राहण्यासाठी सर्वांशी चर्चा करून विचारपूर्वक निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही राज्याचे ऊर्जा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिली. नागपूर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी तयार आहे का? या संदर्भात हॉटेल सेंटर पॉइंट येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
प्रभावती ओझा स्मृती सेवा संस्था, नागविदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स, विदर्भ टॅक्स पेअर असोसिएशन या तीन संस्थांच्या पुढाकारातून चर्चासत्रात महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे ऑनलाइन सहभागी झाले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, सध्या सणासुदीचे दिवस सुरू असून तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने रुग्णवाढीचा धोका दिसत आहे. आपण काळजी घेत असलो तरी त्यात अधिक काळजी घेण्याची गरज आहे. हा उपक्रम नक्कीच कौतुकास्पद आहे. यामध्ये सूचना संवादातून येणाऱ्या संकल्पनेचा फायदा तिसऱ्या लाटेशी लढा देताना येईल.
परिसंवादातून महाराष्ट्राला मदत होईल
कोरोनाचे संकट हे तिसऱ्या लाटेच्या स्वरुपाने आले असले तरी अर्थव्यवस्था चालली पाहिजे. कोरोनाचे संकट असले तरी त्यासाठी आपल्याला काय करावे लागतील त्यासाठी शासन पाठीशी आहे. पण सर्वांनी ठरवून एकत्र येत आपण या संकटाला समोर गेलो तर नक्कीच मदत होईल. चर्चेतून आपली नियमावली तयार होईल, त्याचा उपयोग महाराष्ट्रालासुद्धा होईल असेही थोरात म्हणालेत.
या चर्चासत्रात विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशन, वेद, एमआयए, क्रेडाई, बुटीबोरी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन, यासह व्यापार - उद्योग, औद्योगिक वसाहती, बिल्डर असोसिएशन व वेगवेगळ्या संघटनांचा सहभाग होता. संभाव्य तिसऱ्या लाटेच्या संदर्भात प्रशासन निर्णय घेत असताना संघटनांच्या अडचणींना लक्षात घ्यावे, अशी मागणी या विविध संघटनांनी केली.
लसीकरणाचे लक्ष्य गाठणाऱ्या वॉर्डला 10 लाख विकास निधी?
ऑक्टोबरमध्ये शेवटच्या आठवड्यात कोरोनाची लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दुसऱ्या लाटेत लोकांचा जीव देऊन या कोरोना माहामारीत मोठी किंमत मोजावी लागली आहे. प्रशासन आणि सरकारचा विचार लोकांचा जीव वाचवण्याचा आहे. 100 टक्के लसीकरण केल्यास, त्या भागाला विकास कामासाठी 10 लाख देऊ अशी चाचपणी करू, अशीही माहिती पालकमंत्री राऊत यांनी दिली. ऑक्सिजनची कमतरता जाणवणार नाही. औषधांचा तुटवडा भासणार नाही, तसेच रुग्णांना सोयीसुविधा देताना अडचणी येणार नाही यासाठी म्हत्वाचे पाऊल उचलल्याची माहिती राऊत यांनी दिली.