नागपूर - नागपूर शहरातील गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत आजी आणि नातवाच्या दुहेरी हत्याकांडाची खळबळजनक घटना घडली आहे. हजारीपहाड भागातील कृष्णानगरमध्ये आज दुपारी ही घटना घडली आहे. लक्ष्मीबाई धुर्वे (६० वर्ष-आजी) आणि यश धुर्वे (१० वर्ष- नातू) अशी हत्या झालेल्या दोघांची नावे आहेत. सर्वात महत्वाचं म्हणजे प्रेम प्रकरणातुन हे हत्याकांड घडले असल्याचा संशय पोलिसांना आहे.
चंद्रशेखर रेड्डी - अतिरिक्त पोलीस आयुक्त आरोपींचा शोध सुरू
या घटनेतील आरोपी संदर्भांत पोलिसांना माहिती मिळाली आहे, मात्र पोलिसांनी अद्याप त्या आरोपीच्या नावाचा खुलासा केलेला नसला तरी त्याला अटक करण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना करण्यात आली असल्याची माहिती पुढे आली आहे
आजीच्या नातीसोबत आरोपीचे प्रेमसंबंध?
मृत लक्ष्मीबाई धुर्वे यांच्या नातीचे आरोपीसोबत प्रेम संबंध आहेत. या प्रेम प्रकरणाची कुणकुण घरच्यांना लागल्यानंतर त्याला विरोध सुरू झाला होता. त्यामुळे धुर्वे कुटुंबीयांनी त्यांच्यव मुलीला मध्यप्रदेश राज्यात राहणाऱ्या नातेवाईकांकडे ठेवले होते. त्यामुळे आरोपी हा संतापला होता. या विषयावरून त्याने अनेक वेळा धुर्वे कुटुंबीयांना धमक्या देखील दिल्या असल्याची माहिती पुढे आली आहे. आरोपीने दिलेल्या धमक्यांना गांभीर्याने त्यांनी घेतले नाही. त्यातच आज आरोपीने दुपारच्या सुमारास लक्ष्मीबाई धुर्वे आणि त्यांचा नातू यश हे घरी एकटेच असताना बळजबरीने घरात प्रवेश केला आणि त्या दोघांचीही धारधार शस्त्राने वार करुन खून केला आहे.
संध्याकाळी लक्ष्मीबाई धुर्वे यांचा मुलगा आणि सून कामावरून घरी परतले तेव्हा या दुहेरी खून प्रकरणाचा खुलासा झाला आहे. घटनेची माहिती समजताच गिट्टीखदान पोलिसांसह गुन्हे शाखेचे अनेक अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मेयो रुग्णालयात पाठवले असून तपासाला सुरुवात करण्यात आली आहे.
आरोपीने अतिशय क्रूरपणे केला दोघांचा खून
धुर्वे यांच्या घरात घुसल्यानंतर लक्ष्मीबाई धुर्वे आणि त्यांचा नातू यश याने जोरदार प्रतिकार केला असल्याचे पुरावे पोलिसांना घटनास्थळी मिळून आले आहेत. मात्र, आजीचे वय फार असल्याने त्यांचा प्रतिकार मोडून काढायला आरोपींला फार मेहनत घ्यावी लागली नसेल, तर यश देखील लहान असल्याने फार प्रतिकार करू शकला नसेल. त्यानंतर मात्र आरोपीने अतिशय क्रूरपणे दोघांवर शस्त्राने वार करून त्यांचा खून केला आहे. दोन्ही मृतदेहांवर अनेक जखमा आढळून आल्या आहेत. या घटनेमुळे कृष्णानगर भागात खळबळ माजली आहे.