नागपूर - पावसाच्या आगमनाची चातक पक्षाप्रमाणे वाट पाहण्याची प्रतीक्षा लवकरच संपण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवसात मान्सून अंदमानमध्ये धडकेल अशी शक्यता निर्माण झाली आहे. निर्धारित वेळेच्या सहा दिवस आधी मान्सून अंदमानमध्ये वर्दी देईल, अशी आशा आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार ( Nagpur Meteorological Department forecast ) सर्व काही सुरळीत राहिल्यास जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात विदर्भात पहिल्या पावसाच्या सरी कोसळण्याची चिन्ह दिसत आहेत. त्यामुळे जिवघेण्या उष्णतेमुळे हैराण झालेल्या नागरिकांना लवकर दिलासा मिळणार आहे. यावर्षी नागपूरसह विदर्भात पाऊस सामान्य राहील. मात्र, काही जिल्ह्यात सामान्य पेक्षा जास्त पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाचे संचालक मोहानलाल साहू यांनी व्यक्त केला आहे.
१० ते १५ जून दरम्यान विदर्भात पावसाचे आगमन - मान्सूनचे प्रवेशद्वार समजले जाणाऱ्या केरळमध्ये साधारणपणे महिन्याच्या शेवटी किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाचे आगमन होते असते. त्यानंतर पुढील दहा ते पंधरा दिवसांमध्ये मान्सून संपूर्ण विदर्भात सक्रिय होतो. १ जूनला केरळमध्ये मान्सूनचे विदर्भात आगमन झाल्यास १० ते १५ जून दरम्यान विदर्भात पावसाचे आगमन होण्याची शक्यता आहे.