नागपूर -नागपुरात ऑनलाइन गेमिंग प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला आहे. मागील चार, सहा महिन्यांपासून फरार असलेल्या कंपनी बनवणाऱ्याला आर्थिक गुन्हे शाखेने गोव्यातून ताब्यात घेतले. सुदत्ता रामटेके असे ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर ईगेम्स एशिया असे त्या कंपनीचे नाव आहे.
प्रतिनिधींनी घेतलेला आढावा एका महिलेच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रकरणाचा आवाका पाहता हा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला आहे. मध्यंतरी सुदत्ता रामटेके सोबतच्या एका सहकाऱयाला ताब्यात घेण्यात आले होते. सुदत्ता रामटेके फरार असल्याने त्याचा माघावर पोलीस होते. अनेकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करून तो गोव्यात राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेंद्र अंभोरे यांनी सुदत्ता रामटेकेला बेड्या ठोकल्या.
कोण आहे सुदत्ता रामटेके?
सुदत्ता रामटेके याची प्रोफाईल सुदत्ता रामटेके हा लँड डेव्हलपर क्षेत्रात अनेक वर्षांपासून काम करत आहे. पण मागील काही काळात व्यवसायात तोटा झाला. हाच तोटा भरून काढण्यासाठी त्याने गेमिंगचा नवीन पर्याय पुढे आणला. यात गेमिंग प्लॅटफॉर्म बनवून गुंतवणूकदार जोडण्याची शक्कल लढवली. गेमिंग इंडस्ट्री मागील काही काळापासून झपाट्याने वाढत आहे. यामुळे यात पैसे गुंतवणूक करून नफा देणारा प्लान बनवण्याची शक्कल लढवली.
तीन हजारांपासून 5 लाखापर्यंतची होती गुंतवणूक -
लोकांना 3300 रुपयांपासून 5 लाखांपर्यंत गुंतवणून करता येईल असे प्लॅन तयार करण्यात आले. ज्यात पॉईंटस विकत घेऊन काही पैसे ऑनलाइन माध्यमातून पैसे मिळतील असे सांगण्यात आले. एमएलएम मार्केटिंगप्रमाणे नागरिकांना जोडत जायचे आणि यातून पैसे कमवत जायचा असा हा पर्याय पुढे आला. यासाठी ऑफिस म्हणून लॅण्ड डेव्हलपमेंटसाठी वापरले जाणारे ऑफिसचे गेमिंग ऑफिस उभारले. याच क्षेत्रातील ग्राहकांना त्याने इकडे गुंतवणूक केल्यास वर्षभरात दुप्पट पैसे होईल असेही सांगण्यात आले. यामुळे लॅण्ड डेव्हलपिंग क्षेत्रातील चांगल्या नावामुळे विश्वास ठेवत गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला काही लोकांना नफासुद्धा मिळाला.
14 जणांनी केली फसवणुकीची तक्रार
यामध्ये ऑनलाइन प्लॅटफॉर्ममध्ये पैसे गुंतवलेल्या 14 जणांनी 86 लाखांची फसवणूक झाल्याची तक्रार दिली आहे. यात 18 गेम प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून देण्यात येणार होत्या, ज्यामध्ये ल्युडो, तिनपत्ती कॅरम, क्रिकेट, फुटबॉल, चेस, हॉकी, यासारख्या गेमचा समावेश होता. सध्याच्या काळात लहानच नाही तर मोठे लोकसुद्धा गेमिंग करण्यास गुंतले आहेत. लॉकडाऊनच्या काळात अनेकजण फावल्या वेळात खेळत असल्याचे या गेमिंगचे महत्व वाढले आहे. याच लॉकडाऊन काळात डॉक्टर, इंजिनिअर या लोकांनी पैशांची गुंतवणूक केली.
तपास सुरूच, तक्रारींची संख्या वाढण्याची शक्यता -
यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेकडून तपास सुरू आहे. यात दोन जणांना अटक केली असून, या प्रकरणाचा आणखी तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी महेंद्र अंभोरे आणि त्यांचे पथक करत आहे. यात 200 ते 250 लोकांची फसवणूक झाली असल्याचा संशय पोलिसांना आहे. लगतच्या राजस्थान, मध्यप्रदेश या राज्यातूनसुद्धा तक्रारी येणार असून, 5 कोटी रुपयांच्या घरात फसवणुकीचा आकडा जाण्याची शक्यता आर्थिक गुन्हे शाखेने वर्तवली आहे.