नागपूर- दिवाळीपूर्वीच नागपूर शहर पोलीस विभागात फटाके फुटायला सुरुवात झाली आहे. अवैध वाळू तस्करीच्या प्रकरणी कायदेशीर कारवाई न करत आरोपीना मदत होईल, असे कृत्य केल्या प्रकरणी नागपूरच्या कोराडी पोलीस स्टेशनच्या 4 पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई डीसीपी झोन ५ चे पोलीस उपायुक्त निलोत्पल यांनी केली आहे.
शहरात अवैध धंद्यांना थारा नाही अशा कडक सूचना पोलीस आयुक्तांनी दिल्या होत्या. तरीही कोराडी पोलीस ठाण्याचे कर्मचारी वाळू माफियांच्या मर्जीप्रमाणे काम करत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर चार कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे अशा प्रकारे अवैध काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे धाबे मात्र चांगलेच दणाणले आहेत.
कोराडी पोलीस ठाण्याचे चार कर्मचारी निलंबित पोलीस उपआयुक्ताचे आदेश-
नागपूर शहरात अवैध वाळू तस्करांचे धंदे वाढत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. जिल्ह्यातील अनेक तालुक्यातून आणि शेजारच्या जिल्ह्यातून वाळू तस्करी जोरात सुरू असल्याची माहिती पोलीस आयुक्तांना मिळाली होती, त्यानंतर या संदर्भात कारवाई करण्याचे निर्देश पोलीस उपयुक्तांना देण्यात आले होते. त्यानुसार कोराडीच्या लोणारा तलाव मार्गावर वाळू भरलेला ट्रक जात असल्याची माहिती डीसीपी निलोत्पल यांना मिळाली होती. त्यानंतर त्यांनी कोराडी पोलिसांना या संदर्भात माहिती देऊन त्या ट्रकवर तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. पोलीस उपआयुक्त यांच्याकडून सूचना आली म्हंटल्यावर निरीक्षकांनी देखील तात्काळ दखल घेत कारवाई संदर्भांत कर्मचाऱ्यांना आदेश दिला होता.
अतिरिक्त वाळू केली कमी-
एक एएसआय आणि ३ कर्मचारी घटनास्थळी गेल्यानंतर संबंधित ट्रक त्यांना त्या ठिकाणी आढळून आला, त्यात असलेली वाळू क्षमतेपेक्षा जास्त असल्याचे सिद्ध झाले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळीच अतिरिक्त वाळू रस्त्याच्या कडेला रिकामी करून ट्रकवर कारवाई केल्याचा बनवा रचला होता. पोलिसांनी आरोपीसह ट्रक पोलीस ठाण्यात आणला, मात्र त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या डीसीपी निलोत्पल यांनी कर्मचाऱ्यांचे बिंग फोडले, त्यानंतर चारही पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
घटनास्थळी पोलीस उपायुक्तांचे दुसरे पथक होते तैनात
कोराडी पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी येण्यापूर्वीच डीसीपी निलोत्पल यांचे एक पथक गुप्तरित्या घटनेवर लक्ष ठेऊन होते. कोराडी पोलिसांनी वाळू माफियांना वाचवण्यासाठी अतिरिक्त वाळू रस्त्याच्या कडेला टाकल्याची माहिती त्यांनी लगेचच पोलीस उपायुक्तांना दिली होती. त्यामुळे कोराडी पोलीस ठाण्याच्या चार कर्मचाऱ्यांचे बिंग फुटले, त्यानंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली आहे.